जळगाव हादरलं; टवाळखोरांच्या सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं विष प्राशन केलं
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टवाळखोरांच्या छेडखानीला कंटाळून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टवाळखोरांच्या छेडखानीला कंटाळून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. विष प्राशन केल्याने अल्पवयीन मुलीला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून पीडित मुलीवर उपचार सुरू आहे. टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची व तिच्या बहिणीची छेड काढल्याची घटना घडली होती.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची व तिच्या बहिणीची छेड काढली होती. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीनं छेडखानीला कंटाळून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. विष प्राशन केल्याने अल्पवयीन मुलीला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान टवाळखोरांनी घरात घुसून अल्पवयीन मुलीच्या बहिणीला सुद्धा मारहाण केल्याने ती सुद्धा जखमी असून उपचार घेत आहे. अल्पवयीन मुलीने टवाळखोरांना विरोध केल्याने टवाळ खोरांनी थेट मुलीच्या घरात घुसून पीडित मुलीची व बहिणीची छेड काढत बहिणीला मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलीसह तिच्या वडिलांनी केला आहे .
अल्पवयीन मुलीला टवाळखोर शाळेत जाताना शेतात जाताना पाठलाग करून वारंवार त्रास देत असल्याचाही पीडित मुलीचा आरोप आहे. छेडखानीच्या प्रकरणात अद्यापही पोलिसांकडून गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली, तिच्या प्रकृतीची चौकशी केली. पीडित मुलीच्या बहिणीने व पालकांनी पालकमंत्र्यांसमोर आपबीती कथन करत टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची देखील छेड काढण्यात आली होती. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. मात्र त्यानंतर देखील अशा घटना सुरूच आहेत.