नाथाभाऊंनी नेपाळ दुर्घटनेत बालपणीचा मित्र गमावला; जळगावात मध्यरात्री 27 जणांवर अंत्यसंस्कार
नेपाळमध्ये झालेल्या या अपघातात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 30 वर पोहोचल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. या अपघातातील मृतदेहांवर शनिवारी (24 ऑगस्ट) रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
Nepal bus accident Jalgaon Death : नेपाळमधील पोखरा-काठमांडू दरम्यान असलेल्या एका नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली. या अपघातात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील 28 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा वाढताना दिसत आहे. नेपाळमध्ये झालेल्या या अपघातात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 30 वर पोहोचल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. या अपघातातील मृतदेहांवर शनिवारी (24 ऑगस्ट) रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेपाळमधील अपघातातील मृत व्यक्तींचा आकडा वाढला
नेपाळमधील अपघातात जळगाव जिल्ह्यातील मृत व्यक्तींचा आकडा वाढला. नेपाळमधील अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये जळगावच्या वरणगावमधील आणखी तीन जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. नेपाळमध्ये झालेल्या अपघातातील आकडा 30 वर पोहोचला आहे. या अपघातात मृत्यू झालेले ड्रायव्हर आणि कंडक्टर बाहेरच्या राज्यातील आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे एकनाथ खडसे म्हणाले.
माझ्या बालपणीच्या मित्राचाही मृत्यू
नेपाळमधील दुर्घटनेवर प्रतिक्रिया देत असताना एकनाथ खडसे यांच्यांही डोळ्यात पाणी आलं. नेपाळ येथील अपघातामध्ये माझ्या एका बालपणीचा मित्राचाही मृत्यू झाला आहे, असे सांगत एकनाथ खडसे भावूक झाले. नेपाळमधील अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह काल जळगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जळगाव विमानतळावरुन रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मृतदेह वरणगाव येथे पोहोचले. यावेळी वरणगाव येथील मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांची एकनाथ खडसे यांनी भेट घेत सांत्वन केलं.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंंस्कार
नेपाळ बस दुर्घटनेतील 28 जणांच्या मृतदेहावर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात अत्यंत शोकाकुल वातावरणात रात्री बारा वाजता या मृतदेहांना अग्नी देण्यात आला. या मृतदेहांचे अंत्यसंस्कार संपूर्ण जळगावकरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात पार पडले.
नेपाळ बस दुर्घटनेतील मृत झालेल्यांचे मृतदेह भारतात जळगावात आणून त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केल्यानतर मंत्री रक्षा खडसे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. नेपाळ बस दुर्घटनेनंत नेपाळ सरकार आणि भारत सरकारने तातडीने बचाव कार्य हाती घेतले. यात नेपाळ सरकारने चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींना केंद्र शासनाकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती रक्षा खडसे यांनी दिली.
एक मुलगी बेपत्ता
तर मृत व्यक्तीच्या वारसांना राज्य शासनातर्फे मदत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करणार आहे, असेही रक्षा खडसे म्हणाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगी बेपत्ता झाली आहे. तिचा शोध सुरू आहे तर उर्वरित जखमींवर नेपाळमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना भारतात आणले जाणार आहे.
ही घटना अतिशय दुर्दैवी असून पुन्हा अशी घटना घडू नये अशी अपेक्षा आहे. या घटनेत बस वळणावरून जात असताना चालकाचे नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात आमच्या भागातील तर होतेच शिवाय आमच्या जवळचे देखील होते. या घटनेत एकूण 44 प्रवासी होते. यातील 16 जण काठमांडू येथे उपचार घेत आहेत. तर 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगी बेपत्ता असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले.