Jalgaon : जळगावमध्ये गडकरींच्या हस्ते अपूर्ण महामार्गाचे लोकार्पण; तरीही 15 किमी अंतरात 2 टोल नाक्यांचा भुर्दंड
जळगावमध्ये महामार्गाच्या अर्धवट कामामुळे सातत्याने अनेक अपघात होत आहेत. त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. मात्र, असे असतानाही जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अंधारात ठेवून या रस्त्याच्या उद्घाटनाचा घाट घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
जळगावः केंद्रीय वाहतूक व रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते जळगावात (Jalgaon) आज मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील तरसोद ते चिखली दरम्यान चौपदरी महामार्गाचे लोकार्पण व जळगाव – औरंगाबाद (Aurangabad) महामार्गाचे लोकार्पण होत आहे. मात्र, या महामार्गाची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. मग या कामाच्या उद्घाटनाची लगीनघाई का, असा सवाल विरोधकांसह सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. तरसोद ते चिखली दरम्यान असलेल्या चौपदरी महामार्गावर मार्गावरील नशिराबाद, भुसावळ व फेकरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे (ओव्हरब्रीज) काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे एकेरी मार्गावरुन ये-जा करावी लागते, तर जळगाव औरंगाबाद महामार्गाचे 40 टक्के काम अद्यापही अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला अवघ्या काही दिवसांत तडे पडले आहेत. या कामाबद्दल नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.
गडकरींना अंधारात ठेवून…
अर्धवट कामामुळे या महामार्गावर सातत्याने अनेक अपघात होत असून, अनेकांचे बळी गेले आहेत. मात्र, असे असतानाही जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अंधारात ठेवून या रस्त्याच्या उद्घाटनाचा घाट घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे मुंबई – नागपूर महामार्ग क्रमांक 6 वरील तर असो ते चिखली दरम्यान अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर नशिराबाद व फेकरी असे दोन टोल नाके असल्याने वाहनधारकांची मोठी लूट या ठिकाणी होत आहे. यामहामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने अनेक अपघात देखील होत आहेत. गेल्या काही महिन्यात शेकडोच्या वर अपघात झाले असून, अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत.
हा कसला विकास?
एकीकडे नितीन गडकरी यांच्या हस्ते महामार्गाचे लोकार्पण होणार आहेत. दुसरीकडे ही अर्धवट कामे. असे का, असा सवाल नागरिकांमधूनही उपस्थित केला जात आहे. गडकरी कोणत्याही कामाबाबत किती चोख असतात. त्यांनी अनेक कामे ठरवलेल्या वेळेत पूर्ण करून दाखवली आहेत. मात्र, या कामाचे उदघाटन झाल्यानंतर उर्वरित कामे कधी पूर्ण होणार? की ही कामे पूर्ण करावी म्हणून पुन्हा नागरिकांना आक्रमक व्हावे लागणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हा उद्घाटन कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!