दूध संघातील ‘मलई’ कुणी खाल्ली, जळगावचं राजकारण तापलं
निवडणूक नसतांना देखील जळगाव मधील दूध संघातील पांढऱ्या लोणीवरुण खडसे आणि भाजप यांच्यात राजकारण तापलं आहे.
अनिल केऱ्हाळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील जळगावातील (Jalgaon News) राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. यासाठी निमित्त काही निवडणुकीचे नाही, निमित्त आहे जळगाव दूध संघातील गैरव्यवहार की चोरी या वादाचे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी थेट जळगाव पोलीस (Jalgaon Police) ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. त्यातच आज जळगाव भाजपच्या पदधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यावरच मोर्चा काढत खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जळगाव दूध संघातील १४ टन पांढरे लोणी चोरी किंवा गैरव्यवहार झाल्याचा हा प्रकार आहे. साधारण 14 टण पांढऱ्या लोणाच्या किंमत 70 ते 80 लाख असल्याचे बोललं जात आहे.
दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.
मात्र, त्यांची तक्रार न स्वीकारता त्यांचा दुसऱ्या तक्रारीचा जबाब घेण्यात आला आहे. त्यावरून एकनाथ खडसे यांनी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दखल करण्याची मागणी केली होती.
मात्र, पोलीस गुन्हा नोंदवून घेत नसल्याने एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
याच दरम्यान खडसे यांच्या तब्येत बिघाड झाल्याने त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली होती.
या घटनेवरून खडसे यांनी पोलीस प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचे बोलले जात होते, मात्र पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही.
ही सर्व घटना ताजी असतांना एकनाथ खडसे यांचे विरोधक भाजप पदाधिकारी यांनी खडसे यांच्यावरच कारवाई करावी यासाठी मागणी करत आंदोलन केले आहे.
दूध संघातील लोणी कुणी खाल्ले असे म्हणत चोराच्या उलट्या बोंबा असे विविध फलक घेऊन भाजपने खडसे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
एकूणच दोन्ही बाजूच्या तक्रारी घेऊन पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तपासाअंती दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधिक्षक यांनी दिली आहे.
एकूणच निवडणूक नसतांना देखील जळगाव मधील दूध संघातील पांढऱ्या लोणीवरुण राजकारण तापलं आहे.