1 मे 1981 रोजी जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. पूर्वी तो औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुका होता. या जिल्ह्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. राजा अकबराच्या काळामध्ये जालना हे शहर अकबरच्या एका अधिकाऱ्याला जहागीर म्हणून देण्यात आलेले होते. काही काळासाठी अबुल फजलने या ठिकाणी वास्तव्य केल्याची नोंद आहे. निजाम-उल-मुल्क असफ जहॉ याने या शहराबद्दल काही लिहून ठेवलेले आहे. यामध्ये त्याने औरंगाबादपेक्षाही हे शहर राहण्यासाठी पोषक असल्याचं म्हटलेलं आहे. तसेच 1725 साली त्याने काबिल खान याला जालना शहराच्या पूर्वेला एक किल्ला बांधण्यास सांगितले हेाते. या किल्ल्याचे नाव आज मस्तगड आहे. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ.कि.मी आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत जालना जिल्ह्याने राज्याच्या एकूण भागापैकी 2.51 % भाग व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1.32 टक्के म्हणजेच 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ शहरी भाग आहे. तर उरलेला 98.68 टक्के भाग म्हणजेच 7616 चौ.कि.मी. क्षेत्रफळात ग्रामीण भाग आहे. म्हणजेच या जिल्ह्यात बहुतांश लोक हे ग्रामीण भागात राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यात एकूण 971 गावे आहेत. यापैकी 963 गावे वस्ती असलेली व 8 ओसाड गावे आहेत. जिल्ह्यात 806 स्वतंत्र ग्रामपंचायती व 157 गटग्रामपंचायती आहेत. या आकडेवारीमध्ये काळानुसार बदल झालेला आहे. जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. त्यांची नावे भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा अशी आहेत. या जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, परतूर व मंठा या पाच ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. जिल्ह्यातील जांबसमर्थ, मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ, मत्स्योदरी देवी मंदिर, गुरू गणेश तपोधाम, श्री गणपती मंदीर, मस्तगड आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. जिल्ह्यात परतूर, बदनापूर, घनसावंगी, भोकरदन आणि जालना असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.
जालना जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा