जालनाः रामदास स्वामींनी (Ramdas Swami) पूजलेल्या राम-लक्ष्मण-सीतेच्या प्राचीन मूर्ती चोरी प्रकरणी आता जांब समर्थ गावकऱ्यांनी (Jamb Samarth) अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मंदिरातील मूर्ती चोरीच्या (Jalna Theft) घटनेला आज तीन दिवस उलटल्यानंतरही चोरट्यांचा शोध लागलेला नाही. सुमारे 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती अशा एकाएकी चोरीला गेल्यामुळे भाविकांमध्ये मोठी अस्वस्थता असून जांब समर्थ येथील गावकऱ्यांमध्येही नाराजी आहे. पोलिसांनी वेगाने तपास करून मंदिरातील मूर्ती आणून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मूर्ती मिळाल्या नाही तर, अन्नत्याग करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता. त्यानुसार प्रशासनाला एक दिवसाची मुदती दिली होती. मात्र चोरट्यांचा शोध न लागल्यामुळे आजपासून जांब येथील गावकरी अन्नत्याग करत आहेत.
रामदास स्वामी यांचे 11 वे वंशज भूषण स्वामी यांनी जांब येथे भेट दिली. सोमवारी रात्रीच ते गावात दाखल झाले आहेत. गावकऱ्यांची भेट देऊन पोलिसांच्या तपासाला सर्वांनी सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. समर्थ रामदासांच्या देवघरात झालेली चोरी निषेधार्ह असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच लवकरात लवकर देवाच्या मूर्ती शोधून काढाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
रविवारी मध्यरात्रीनंतर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ या रामदास स्वामींच्या मूळ गावी ही चोरी झाली. रामदासांच्या घरात, ते ज्या मूर्तींची पूजा करत असत, त्याच मूर्ती चोरट्याने पळवल्या. पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना कळली. या मंदिरातल्या राम-लक्ष्मण-सीतेची पंचधातूंची मूर्ती चोरीला गेली. तसेच राम-लक्ष्मण-सीता-भरत-शत्रुघ्न यांचे पंचायतनदेखील चोरीला गेले आहे. रामदास स्वामी हनुमानाची जी मूर्ती झोळीत घेऊन प्रवास करत असत, तीदेखील चोरट्यांनी पळवली आहे. महाराष्ट्रातून असंख्य भाविक जांब येथे मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. मात्र याच मूर्तींची चोरी झाल्याने गावकरी सैरभैर झाले आहेत. या मूर्ती चोरी प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून जालन्याचे आमदार राजेश टोपे यांनी अधिवेशनात समर्थांच्या मूर्ती चोरीचा मुद्दा मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोरी प्रकरणी वेगाने तपास करण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर प्राचीन मूर्ती मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं होतं. मात्र पोलीस तपासात अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.