तरवाली सराटी | 13 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षण आणि त्यासाठी केलं जाणारं आंदोलन आता अधिक तीव्र झालं. त्याला कारण ठरलं ते जालना जिल्ह्यातील एक घटना. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केलं जात होतं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि इतर आंदोलक उपोषण करत असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. या घटनेनंतर मराठा समाजात आक्रोश निर्माण झाला. राज्यभर या घटनेचे पडसाद उमटू लागले. अशातच मनोज जरांगेंनी सरकारला धारेवर धरलं. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं म्हटलं. पण खालावत चाललेली तब्येत पाहता आमरण उपोषण त्यांनी मागे घेतलं. मात्र आता पुढचा महिनाभर मनोज जरांगे पाटील आंदोलनस्थळीच असणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण आणि कुणबी जातप्रमाणपत्र मिळावं, यासाठी ते आग्रही आहेत. आमरण उपोषणाच्या काल पंधराव्या दिवशी त्यांनी आमरण उपोषण मागे घेतलं. त्यानंतर आजपासून पुढचा महिनाभर आंदोलनस्थळी असणार आहेत. ते साखळी उपोषण करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी एक महिन्याचा वेळ दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देतील ही आम्हाला खात्री आहे. पण त्यांनी पुढच्या महिनाभरात हा निर्णय घ्यावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. महिनापूर्ण झाला की 31 दिवशी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी राज्यात साखळी उपोषण सुरू करावं. कुणीही उग्र आंदोलन करू नये, असं अवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषण सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील नेत्यांनी उपस्थित राहावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. पण प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आज निर्णय घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी उपस्थित रहावं, असा सरकारमध्ये सूर आहे. याबाबत मुख्यमंत्री आज निर्णय घेणार आहेत.