जालन्यातल्या रेल्वे पीटलाइनची जय्यत तयारी, ज्यादा चार ट्रॅक, 18 घरे पाडणार, प्राथमिक आराखडा तयार!
रेल्वे पीटलाइनद्वारे मराठवाड्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन (Jalna Railway Station) म्हणून जालन्याची ओळख होईल. तसेच औद्योगिक आणि व्यावासायिक विकासाच्या दृष्टीने मोलाची भर पडेल, असे उद्दिष्ट ठेवत रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या पुढाकारातून जालन्यात ही पीटलाइन होत आहे.
जालनाः रेल्वे दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रेल्वे पीटलाइनची (Railway Pitline) जालन्यात जय्यत तयारी सुरु आहे. यासाठीचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून पीटलाइनसाठी अतिरिक्त चार ट्रॅक केले जातील. तसेच परिसरातील 18 घरे पाडली जाऊन त्यासाठी 40 फ्लॅटचे क्वार्टर तयार करण्यासह सर्व्हिस इमारत, इलेक्ट्रिकल कार्यालय, रेल्वे क्रॉसिंग असेब्लिंग इत्यादी कामे केली जातील. रेल्वे पीटलाइनद्वारे मराठवाड्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन (Jalna Railway Station) म्हणून जालन्याची ओळख होईल. तसेच औद्योगिक आणि व्यावासायिक विकासाच्या दृष्टीने मोलाची भर पडेल, असे उद्दिष्ट ठेवत रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या पुढाकारातून जालन्यात ही पीटलाइन होत आहे.
काय आहे रेल्वेची पीटलाइन?
रेल्वेचे डबे आणि इंजिनच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठीचे वर्कशॉप म्हणजे पीटलाइन होय. ज्या ठिकाणी पीटलाइन असते, त्याठिकाणी 28 डब्यांच्या रेल्वेची इंजिनासह स्वच्छता, इलेक्ट्रिक वर्क, ऑयलिंगसह इतर कामे होतात. एका लाइनवर 24 तासात सहा गाड्यांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. ज्या ठिकाणी पीटलाइन असते, त्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. त्यामुळे संबंधित स्टेशनपासून जास्त रेल्वे गाड्या सुरु होऊ शकतात. अर्थातच यामुळे रोजगार आणि औद्योगिक विकासाच्या शक्यता दाट असतात.
रेल्वे पीटलाइनचा फायदा काय?
– जालना शहरात पीटलाइन झाल्यास शहरातून दर 24 तासांनी दररोज 23 ते 25 रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या होतात. 2 हजार किलोमीटरपर्यंत चालणाऱ्या रेल्वेचे टेक्निकल व इलेक्ट्रिकलसह स्वच्छता होणे गरजेचे असते. – जालन्यात रेल्वेची पीटलाइन (प्रायमरी सेंटर) होत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास दिवसभरात रेल्वेच्या 75 डब्यांचे मेंटेनन्स करता येणार आहे. दुरुस्ती झाल्यानंतर फिटिंगचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच या ठिकाणाहून रेल्वे पुढे जाईल. – मनमाड, सिकंदराबादहून निघालेल्या रेल्वेगाड्यांना 663 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तेरा तास लागतात. या अंतरात रेल्वेची स्वच्छता, दुरुस्तीसह इतर कामे करण्याची गरज असते. नांदेड ते मनमाड अंतराच्या अनुषंगाने जालना रेल्वेस्थानक हे प्रायमरी मेंटेनन्स पीटलाइन केंद्रासाठी सोयीस्कर ठरत असल्याने येथे पीटलाइन होत आहे.
जालना होतेय मराठवाड्यातील महत्त्वाचे स्टेशन!
दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील जालना हे एक महत्त्वाचे स्टेशन आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या या ठिकाणी थांबतात. अनेक मालाची मोठ्या प्रमाणावर येथून वाहतूक होते. यात खनिजे, खते, तेल, शेती उत्पादन, लोखंड, पोलाद, मिश्र वाहन वाहतूक यासह मोठी बंदरे, मोठ्या शहरांमध्ये मालवाहतुकीसाठी आणि मालगाडीत माल चढवण्यासाठी तसेच उतरवण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नांतून या ठिकाणी पीटलाइन होत आहे.
पीटलाइनच्या निविदांमध्ये कोणती कामे?
जालन्यात होऊ घातलेल्या पीटलाइनच्या निविदांमध्ये कोच देखभाल आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी 27 कोटी 65 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. तर ट्रॅकची अंथरणी, पुलांची कामे, इमारती आणि क्रॉसिंग असेब्लिंगवर 12 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तसेच ही कामे बारा महिन्यांच्या आत करण्याच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या आहेत.
इतर बातम्या-