समृद्धी महामार्गावर जालन्यात राजेशाही सजावट, पुलावर लक्षवेधी नक्षीकाम, ‘जालना सोने का पालना’ थीम काय ?
जालना सोने का पालना या संकल्पनेवर समृद्धी महामार्गावरील पुलाचं नक्षीकाम सुरु आहे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना येथील वैभवाची जाणीव करून देण्यासाठी हे काम केलं जातंय.
औरंगाबादः नागपूर ते मुंबई (Nagpur-Mumbai) या समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Highway) काम संपूर्ण मराठवाड्यात प्रगतीपथावर आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या महामार्गाचे बांधकाम, पुलांची मजबुती, बोगद्यांची देखणी व्यवस्था अतिशय लक्षवेधी ठरत आहे. जालन्यातून जाणाऱ्या (Jalna Samruddhi Mahamarg) या मार्गावरील 20 मीटर पुलावरही अत्यंत आकर्षक काम सुरु आहे. या पुलावर सोनेरी रंगातील खांब उभारून त्याव अत्यंत सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील 12 कारागीर दोन महिन्यांपासून मेहनत घेत आहेत. जालन्यातून या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना इथल्या वैभवाची ओळख करून देण्यासाठी ही सजावट करण्यात येत आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरीस या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन, रस्त्याचे कामही अंतिम टप्प्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
राजेशाही सजावटीचा पूल नेमका कुठे?
समृद्धी महामार्गाचा जालना शहरातून जो रस्ता जातोय, तेथे 20 मीटर पुलावर मोठे खांब उभारून नक्षीदार जाळ्या बसवून या पुलाचे सौंदर्यीकरण केले जात आहे. इंटरचेंजच्या ठिकाणी तीन केबिन, डिजिटल यंत्रणा बसवण्यात आली आहे. टोलनाक्याच्या काही अंतरावर गेल्यानंतर पुलाच्या ठिकाणी नक्षीकाम सुरु आहे. येथील पुलावर जीआरसी अर्थात ग्लास फायबर प्रचलित काँक्रीट साहित्य वापरून हे डिझाइन सुरु आहे.
जालना सोने का पालना थीम काय?
जालना सोने का पालना या संकल्पनेवर समृद्धी महामार्गावरील पुलाचं नक्षीकाम सुरु आहे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना येथील वैभवाची जाणीव करून देण्यासाठी हे काम केलं जातंय. महाराष्ट्रात मोठ्या व्यापारी बाजारपेठेसाठी जालन्याची ख्याती आहे. असं म्हणतात की, रामायण काळात जालन्याचं नाव जनकपुरी असं होतं. जालेरायाने ही व्यापारी पेठ वसवली. तिचं नाव पुढे जाल्हनपूर पडलं आणि त्याचा अपभ्रंश होऊन जालना हे नाव तयार झालं. निजामाच्या काळात जालना शहराचा संपूर्ण देशाशी संबंध आला आणि व्यापार धंद्यांशी इथली संस्कृती जोडली गेली. आज तर बियाणांपासून थेट स्टील उद्योगांपर्यंत जालना संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच जालना सोने का पालना ही शहराची ओळख जपण्यासाठी समृद्धी महामार्गावर विशेष मेहनत घेऊन ही डिझाइन साकारली जातेय.
इतर बातम्या-