जालन्यात पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने 5 मजुरांचा दबून मृत्यू
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा त्याखाली दबून मृत्यू झाला.

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा त्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना असून काल मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावर पुलाचं काम करणाऱ्या मजुरांवर काळाने घाला घातला. या घटनेमध्ये पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 वर्षांच्या एका मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात मात्र यश आलं आहे. दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येत आहे.
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून या पुलाचे काम करणारे मजूर पुलाशेजारीच पत्र्याची शेड बांधून राहत होते. काल रात्री ते मजूर मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच साडेतीनच्या सुमारास वाळूच्या एका टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेडशेजारी वाळू रिकामी केली. मात्र गाढ झोपलेले ते मजूर वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि गुदमरल्यामुळे त्या मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र एक 13 वर्षांची मुलगी आणि एक महिला या दोघांनी कसेबसे वाचवण्यात स्थानिकांना यश मिळालं.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जाफरबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेप्रकरणी तपास सुरू केला आहे.