70 पोलीस काय पाय घसरून पडले का?; छगन भुजबळ यांचा सवाल
ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी जालना अंबड येथील महाएल्गार परिषदेत तुफान फटकेबाजी केली. त्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तिखट शब्दात हल्ला केला. पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने आंदोलन भरकटून बदनाम झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अंबड | 17 नोव्हेंबर 2023 : जालन्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारसह मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. त्यावेळी पोलिसांचा लाठीमार झाला. पोलिसांचा लाठीमार सर्वांनी पाहिला. पण 70 पोलीस जखमी झाले. महिला पोलीसही जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे सर्व पोलीस दगडांचा मार खावून जखमी झाले. जरांगेंना उठवायला पोलीस गेले होते. त्यावेळी मी झोपलोय नंतर या, असं जरांगे म्हणाले. त्यामुळे पोलीस गेले. याने गच्चीवरून सर्व तयारी केली होती. पोलीस जेव्हा त्यांचं उपोषण सोडवायला गेले. तेव्हा दगडांचा मारा सुरू झाला. पटापट पोलीस जमिनीवर पडले. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?; असा सवाल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
ओबीसी समाजाची भव्य रॅली आज जालन्यातील अंबडमध्ये पार पडली. यावेळी छगन भुजबळ यांनी तडाखेबंद भाषण केलं. पोलिसांना कोणी मारलं याचं हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड आहे. एवढंच नाही. या राज्यातील महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नीलम गोऱ्हे आणि आणखी कोणी असेल. त्यांनी त्या महिला पोलिसांची भेट घ्यावी आणि त्यांच्याकडून माहिती घ्यावी. शिवाजी महाराजांनी मोगलांच्या स्त्रियांना आई म्हणून घरी पाठवलं आणि तुम्ही पोलिसांवर हात टाकला. लाज नाही वाटली तुम्हाला? हे सर्व झाल्यावर पोलिसांनी मग लाठीमार केला, असं छगन भुजबळ म्हणाले.
राज्य भी तुम्हारा है और
आमच्या राज्यकर्त्यांचं काय सांगायचं? पोलिसांची बाजू समोर आलीच नाही. एकच बाजू आली. पोलिसांवर हल्ला झाला. महिलांवर हल्ला झाल्यावर पोलिसांनी करायचं काय? आमचंच राज्य आहे. पण कसं आहे? लष्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा है तुम झुठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है इस दौर के फरियादी जाये तो जाये कहाँ राज्य भी तुम्हारा है और दरबार भी तुम्हारा है…
अशी शायरी करत भुजबळांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला. बडचे आमचे मित्र टोपे आणि दुसरे आमचे मित्र रोहीत पवार यांनी जरांगे पाटीलांना रात्री तीन वाजता घरातून बाहेर घेऊन आले. त्यांना सांगितले की शरद पवार येणार आहे. लाठीचार्ज का झाला हे पवार साहेबांना नाही सांगितलं. आम्ही आजही पवार साहेबांना उत्कृष्ट प्रशासक समजतो. त्यांना परिस्थिती सांगितली असती तर हे प्रकार इथे झाले नसते असेही भु़जबळ यावेळी म्हणाले.
त्यामुळे मराठा आंदोलन बदनाम झालं
दोशी नावाचा एसपी आहे. त्याने पोलिसांना मारहाण झाल्याचे सांगायला हवे होते. मी फडणवीस यांना विचारले तुमच्याकडे सर्व माहिती आहे. माझ्या पोलिसांवर मारहाण झाली मी सहन करू शकत नाही असे त्यांनी म्हणायला हवे होते. उलट त्यांनी पोलिसांना निलंबित केले आणि होम मिनिस्टरनेच माफी मागितली. गुन्हे मागे घेतो म्हणाले, किती लांगूलचालन करायचे. पोलिसही विचार करायला लागले की आम्ही काही करायला गेलो तर आमच्यावर हल्ले आणि उत्तर दिले तर सस्पेंड. त्यामुळे त्यांची हिंमत वाढून मराठा आंदोलन बदनाम झाल्याचेही भुजबळ म्हणाले.
‘राखरांगोळी’ या शब्दाचा अर्थ…
आमदार प्रकाश सोळंके काय एवढं बोलले होते की त्यांच्या घरावर हल्ला केला. त्याचं ऑफिस आणि गाड्या जाळल्या. सर्व ठिकाणी पेट्रोल बॉम्ब, कोयते तयार, चॉपर तयार, पहारी तयार सर्व गोष्टी तरुणांकडे होत्या. 200 ते 400 लोक घरावर चालून गेले. सोळंकेचं घर जाळलं. प्रत्येकाच्या घराला कोड नंबर देण्यात आले होते. अनेक ग्रुप आंदोलनात सक्रीय होते. सुभाष राऊतचं हॉटेल दहा ते पंधरा किलोमीटर लांब. तो काय आमदार आहे का.? तो माझ्या चेंबरमध्ये बसला होता. टीव्हीवर सोळंके सायबाचं घर जाळल्याचं आपण पाहिलं. मी एसपीला फोन केला. सोळंकेवर हल्ला झालाय. आता राऊत यांच्यावर हल्ला होईल असे आपल त्यांना सांगितलं. चार वाजता राऊतचं हॉटेल जाळलं गेले. ‘राखरांगोळी’ या शब्दाचा खरा अर्थ मला त्यावेळी मला कळल्याचे भुजबळ यांनी सांगितले.