VIDEO | भाजपच्या निलंबित आमदाराचा ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर डान्स
नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. मात्र विधीमंडळातील गैरवर्तनाबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जालना : लग्न म्हटलं, की बँड-बाजा आणि गाण्याच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी आले. गाणं वाजायला लागलं, की त्यावर ठेका धरण्याची इच्छा अनेकांना होते. कधी-कधी राजकीय नेते मंडळींनाही याचा मोह आवरत नाही. असाच भन्नाट डान्स जालन्यातील निलंबित आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांनी एका लग्न समारंभात केला आहे. कुचे यांच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Dance Video Viral) झाला असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
कोण आहेत नारायण कुचे?
नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. मात्र विधीमंडळातील गैरवर्तनाबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. योगायोग म्हणजे, नारायण कुचे ज्या गाण्यावर बेभान होऊन नाचत असताना कॅमेरात कैद झाले आहेत, त्या गाण्याचे शब्द आहेत ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय, जवा बघतीस तु माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, हे साजन बेंद्रे यांनी लिहिलेलं गाणं चांगलंच प्रसिद्ध आहे. साजन-विशाल यांनी संगीत दिलेलं हे गाणं ग्रामीण भागातील अनेक कार्यक्रमात वाजतंच. त्यामुळे आमदार महोदयांनाही या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.
पाहा व्हिडीओ
कुचेंना डान्सची आवड
नारायण कुचे हे मतदारसंघातील अनेकांच्या लग्नाला हजेरी लावत असल्याचं त्यांच्या फेसबुक पोस्टमधून पाहायला मिळतं. विशेष म्हणजे नारायण कुचे यांनी डान्सची चुणूक दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एका कार्यकर्त्याच्या लग्नात कुचे बँडच्या तालावर तुफान डान्स करताना कॅमेरामध्ये कैद झाले होते. त्यावेळीही त्यांच्या नृत्यकौशल्याची चर्चा समर्थकांमध्ये रंगली होती.
निलंबनाची कारवाई
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं गेल्या अधिवेशनात निलंबन करण्यात आलं होतं. नारायण कुचे यांच्यासह आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, किर्तीकुमार बागडिया या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. वर्षभरात विधीमंडळाच्या अधिवेशनात सामिल होण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
आमदार नारायण कुचे यांचा कार्यकर्त्याच्या लग्नात डान्स
विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक बिनविरोध? तर, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द ?
भाजप आमदाराच्या पुतणीच्या लग्नात तोबा गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन