मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, मुलगा शिवराज म्हणतो, आधी…
मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाचे डोळे पानावले होते. शिवराज जरांगे पाटील म्हणाला, पप्पाची काळजी वाटायला लागली. कारण गेल्या ९ दिवसांपासून पप्पाच्या पोटात अन्नाचा कण नाही.
जालना, ६ सप्टेंबर २०२३ : जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अडून बसलेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. आज त्यांना सलाईन लावण्यात आले. तरीही मनोज जरांगे यांचा हट्ट कायम आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्य शासन बैठकांवर बैठका घेत आहे. मंत्रीमंडळाची बैठक झाली. काय निर्णय होतो ते लवकरच कळवलं जाणार आहे. या आंदोलनासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना मनोज जरांडे पाटील यांच्या मुलाचे डोळे पानावले होते. शिवराज जरांगे पाटील म्हणाला, पप्पाची काळजी वाटायला लागली. कारण गेल्या ९ दिवसांपासून पप्पाच्या पोटात अन्नाचा कण नाही.
समाजाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी लढत राहू. आरक्षण घेऊनचं येऊ. पप्पाच्या जीवाला धोका झाल्यास जबाबदारी सरकार घेईल. अन्न न खाता पप्पा उपोषण करत आहेत, हे सरकारला कळायला हवं. आधी समाज महत्त्वाचा नंतर घर आम्हाला महत्त्वाचं आहे. पप्पांना घरातून पूर्ण पाठिंबा आहे. आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे, असंही शिवराज जरांगे पाटील म्हणाला.
मनोज यांचे वडील रावसाहेब म्हणतात,….
मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे पाटील म्हणाले, गरिबीची परिस्थिती होती. आम्ही कुणबी मराठा. वडील शेती करायचे. वडिलांकडे दहा एकर जमीन होती. मी शेती करून शेती खरेदी केली. एकूण १२ एकर जमीन केली. चार मुलं आहेत. त्यापैकी तीन एकर जागा ही मनोज जरांगे यांना दिला. मनोज जरांगे यांनी शेती विकून मराठा आरक्षणाचे आंदोलन चालवले. त्याला वडील म्हणून काही म्हटलं नाही. कारण त्याने समाजासाठी वाहून घेतले आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे.
मनोज जरांगे यांचे सासरे म्हणतात,….
मनोज जरांगे यांचे सासरे म्हणाले, परिस्थिती पाहून मुलगी दिली. धाडसी माणूस आहे. लग्नाच्या आधी दोन वर्षे माझ्याकडेचं होते. एक एकर मी खरेदी करून दिली होती. मनोज यांनी एक एकर जमीन विकली. समाजासाठी पैसे खर्च केले. तो विकणारा माणूस नाही. लहानपणापासून पाहतो.