मोठी बातमी! जालन्यात इनकम टॅक्सचा मोठा छापा, तब्बल 58 कोटी कॅशसह 32 किलो सोनं जप्त, 390 कोटीची मालमत्ता जप्त
Jalna Income Tax Raid News : तब्बल 58 कोटी रुपयांची रक्कम आणि 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
जालना : जालन्यात (Jalna News) इनकम टॅक्सने छापा (Jalna Income Tax Raid) टाकून मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील स्टील व्यावसायिकावर इनकम टॅक्सने छापा टाकला. या छाप्यामध्ये तब्बल 58 कोटी रुपयांची रक्कम आणि 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त (390 Cr property seized) करण्यात आली आहे. इनकम टॅक्स विभागाच्या तब्बल 100 अधिकाऱ्यांनी एकत्रित ही छापेमारी केली. यावेळी रोख रक्कम मोजण्यासाठीच तब्बल 14 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 12 मशील रोख रक्कम मोजण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दुल्हन हम ले जाएंगे, अशा स्वरुपाचे स्किकरही गाड्यांवर लावण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
थोडक्यात, पण महत्त्वाचं
- 58 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त
- 32 किलो सोन्यासह 390 कोटींची मालमत्तेवर टाच
- 100 प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची छापेमारी
- नोटा मोजण्यासाठी 12 मशीनला लागले तब्बल 14 तास
कुठे सापडली कॅश?
आयकर विभागाने मारलेल्या छापमारीमध्ये सुरुवातील कुठेच रोकड आणि बेनामी रक्कम आढळून आली नव्हती. मात्र त्यानंतर आयकर विभागाने संबंधित व्यावसायिकाच्या शहराबाहेर असलेल्या फार्महाऊसवर छापा टाकला. तिथे तपास केला. या तपासामध्ये कपाटाखाली, बिछान्यंमध्ये रोख रक्कम आढळून आल्याची माहिती समोर आलीय. इतकंच काय तर अडगळीमधील काही पिशव्यांमध्येसुद्ध रोकड सापडली. मोठ्या प्रमाणात नोटा आढळून आल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले होते. तर दुसऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातच अशाचप्रकारे रोख रक्कम आढळून आली.
कुणावर टाकली आयकर विभागाने रेड?
इनकम टॅक्स विभागाने मारलेल्या छापेमारीत जालन्यातील चार मोठ्या स्टील व्यावसायिकांवर छापा टाकला. या व्यावसायिकांची नावं अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, औरंगाबाद पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्टील व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जालन्यात एक ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांमधून जात एकूण पाच पथकांनी स्टील व्यावसायिकांच्या घरावर आणि ऑफिसवर छापा टाकला होता.
1 ऑगस्टला टाकण्यात आलेल्या या छापेमारीबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. 8 ऑगस्टपर्यंत आयकराचे अधिकारी तपास करत होते. नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एकूण अडीचशेपेक्षा जास्त अधिकारी 120 हून अधिक वाहनांमधून जालन्यात धडक दिली होती. जालन्यात आढळून आलेली रोख रक्कम स्थानिक स्टेट बँकेत नेण्यात आली. तिथे सकाळी 11 वाजता या रोख रकमेची मोजणी सुरु करण्यात आली होती. ही मोजणी तब्बल 14 तासांनी म्हणते मध्यरात्री एक वाजता पूर्ण झाल्याची माहिती समोर आलीय.