Maratha Reservation : 5 वाजेपर्यंतची वेळ, त्यानंतर मनोज जरांगे पाटील आज घेणार एक मोठा निर्णय
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणचा आज आठवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. शुगर, बीपी डाऊन आहे. झोप लागत नाहीय. भाजपा आमदार आणि मंत्री गिरीश महाजन आज पुन्हा एकदा आंदोलनस्थळी जाणार आहे.
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मागच्या आठवड्यात जालना येथे मराठा समाजावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा हा विषय तापला आहे. सध्या सर्वपक्षीय नेते जालना येथे आंदोलनस्थळी जाऊन मुख्य आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणचा आज आठवा दिवस आहे. त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून त्या निर्णयावर ते अमल सुरु करतील. असं झाल्यास सरकारच्या अडचणी आणखी वाढू शकतात. आधीच उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाहीय. शुगर, बीपी डाऊन आहे. झोप लागत नाहीय. अशावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सोडल्यास त्यांची प्रकृती आणखी खालावेल.
सरकारने काल पत्रकार परिषद घेतली. त्यानंतरही मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सरकारने अध्यादेश घेऊन यावं, नाहीतर आजपासून पाण्याचा त्याग करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गिरीश महाजन आज जालन्यातील आंदोलन स्थळी जाणार आहेत. सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारच शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. या शिष्टमंडळात गिरीश महाजन, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा समावेश आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. “मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एवढ्या विलंबाची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने हा विषय मार्गी लावावा एवढीच आमची इच्छा आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“मी आंदोलनावर ठाम असून शांततेत आंदोलन सुरु ठेवणार. महाराष्ट्रतील मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकारच्या शब्दावर मी पाणी सुरु केलं होतं. पण आज सरकारी अध्यादेश आला नाही, तर पाच वाजल्यापासून पाण्याचा त्याग करणार. मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
‘नुसत्या चर्चा करुन अंत पाहू नका’
“सरकारचे प्रतिनिधी आज भेटीला येण्याबद्दल काही निरोप नाही. टीव्ही 9 च्या माध्यमातून आता याबद्दल माहिती मिळेतय” असं त्यांनी सांगितलं. “आम्ही चर्चेची दार खुली ठेवणार. चर्चेशिवाय मार्ग नाही हे आम्हाला समजतं. पण, नुसत्या चर्चा करुन अंत पाहू नका. वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.