आमच्यावर लावलेली सगळी कलमं पोलिसांवर लावा, कुणालाच सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील आक्रमक
Jarange Patil on Maratha Reservation : आमच्यावर लावलेली सगळी कलमं पोलिसांवर लावा, कुणालाच सोडणार नाही; मराठा आंदोलकांवरील लाठीमार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
जालना | 07 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा काही वर्षांपासून ऐरणीवर आहे. अशातच जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होतं. या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आलाय या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले. या आंदोलनातील आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्याचा जाहीर निषेध केलाय. त्यांनी सरकारला मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच या लाठीमारावेळी निष्पाप आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला. यांना मी सोडणार नाही. आमची क्रॉस कम्पेंलेंट घ्या, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
आम्हा आंदोलकांवर भयानक कलम लावलेत. प्रशासनालाही हे माहिती आहे की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं. पण तरीही आमच्यावर गंभीर कलमं लावण्यात आली आहेत. सामुहिक कट रचून हल्ला केल्याचा गुन्हा आमच्या विरोधात दाखल झालाय. 120 ब कलम लावण्यात आलं. सामुहिक कट रचून हल्ला हा तुमच्या अधिकाऱ्यांनी केला अन् गुन्हे आमच्यावर दाखल करताय. आम्ही उपोषणाला बसलेलो होतो. आंदोलनाला बसलेले लोक सामुहिक कट रचत नाहीत. तर ठरवून आलेला पोलिसांचा ग्रुप ते कट रचून आले. त्यांच्यावर सामुहिक कटाचा गुन्हा दाखल करा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आमच्यावर लावण्यात आलेली सगळी कलमं त्या पोलीस अधिकाऱ्यांवर लावली पाहिजेत. हा अधिकार आम्हाला आहे. म्हणून आम्ही सांगतोय आमची क्रॉस कम्पलेंट घ्या. कारण त्या अधिकाऱ्यांवर ही कलमं लावण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आहे. मी राष्ट्रपतींकडेही याबाबत मागणी करणार आहे. मी कुणालाही सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हे सगळं मान्य नसावं. त्यामुळे आमची क्रॉस कंप्लेट घ्या, असं जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. ते अन्नत्याग उपोषण करत आहेत. आज 11 वाजता जरांगे पाटील सहकाऱ्यांशी चर्चा करून आपली भूमिका जाहीर करणार आहेत. जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधार्थ ठिकठिकाणी बंद पाळण्यात येतोय. करमाळा शहर बंद ठेवत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. सकल मराठा समाजाच्यावतीने शासनाला बांगड्यांचा आहेर देण्यात आला आहे. करमाळ्यातील पोथरे नाका ते तहसील कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही प्रमुख मागणी करण्यात आली.