आज-उद्या मी बोलू शकतो, माझा आवाज चालू आहे, तोवर चर्चेला या…; मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन
Manoj Jarange on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. सरकारला आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. आता आम्ही मागे हटणार नाही. क्षत्रियांनी रडायचं नसतं, लढायचं असतं, असं मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे, वाचा सविस्तर...
संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 29 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे यांनी चर्चा करण्यासाठी साद घातली होती. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. आज-उद्या मी बोलू शकतो. माझा आवाज अजून चालू आहे. माझा आवाज नीट आहे तोवर चर्चेला या, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या चिठ्ठीवरही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे.
गावागावातील लोकांच्या चुली पेटत नाही. जेवणही करत नाही. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या असं संभाजीराजे चिठ्ठी लिहून म्हटलं आहे. त्यांनी संदेश दिला आहे. मी या गादीला कधीच नाही म्हटलं नाही. पण गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे.मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतो. गादीने समाजाच्या कल्याणासाठी कधी माघार घेतली नाही. मीही कधी माघार घेणार नाही. मी गादीचा शब्द कधीच खाली पडू दिला नाही. पण माझा नाईलाज आहे. समाजाच्या कल्याणासाठी न्यायासाठी मला ही कठोर भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे गडाने मला माफ करावं. हे तुमचेच लेकरं आहे. तुमचेच भक्त आहेत. त्यामुळे गडाने मला माफ करावं, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांना केलं आहे.
मी पाणी , उपचार घेऊ शकत नाही. माझ्या लेकरांच्या वेदना सरकारने ओळखाव्यात. तातडीने निर्णय घ्यावा. पुन्हा पुन्हा सांगतो मी गडाला कधीच नाही म्हटलो नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.
आता माझा नाईलाज आहे. समाजाने खूप वेदना सहन केल्या. जातीवर खूप अन्याय झाला. आता होऊ द्यायचं नाही. त्यामुळे ही लढाई आहे. माझा हेकेखोरपणा नाही. आडमुठेपणाही नाही. पण जातीवर खूप अन्याय झाला. मला थांबता येणार नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.