पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil on Pankaja Munde Mlc Election Candidacy : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर भाष्य केलंय. वाचा...
भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे. विधानपरिषदेवर घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांना मंत्रिपदही दिलं जाणार असल्याची माहिती आहे. काही वेळाआधी भाजपने विधान परिषदेच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर केली. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोखले यांची नावं भाजपने जाहीर केली आहेत. पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. आम्ही नाही म्हणल्याने भाजप थोडी घेणार त्यांना विधान परिषदेवर घेणार नाही… पंकजा मुंडेंना आमचा विरोध असण्याचा कारणच नाही. आम्ही यापूर्वीही कधी विरोध केला नाही. मात्र त्यांनीच आम्हाला विरोधक मानले. त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पद मिळालं मराठ्यांना विरोध असण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात होत्या. मराठ्यांनी त्यांना कधी विरोध केला नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
पंकजा मुंडे यांना आमदार करणं न करणं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे… मराठ्यांचा काही देणं घेणं नाही. आम्ही त्याचं स्वागत केलं आणि नाही केलं तरी त्यांच्यात काही फरक पडणार नाही. त्यांच्या समाजाचा मत परिवर्तन होत असेल तर नक्की कौतुक आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
माझ्या समाजाचं नुकसान होतंय का? नुकसान होतोय हे माझ्या समाजाला चांगलं माहित आहे. कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्या ताईंविरोधात तर आम्ही कधी एक शब्दही बोललो नाही. माझ्या समाजाचा चांगलं होते की नुकसान होते हे माझ्या समाजाला चांगलं माहित आहे. जे 70 वर्षात आरक्षण मिळाल नाही, आरक्षण कुणबीमधून मिळायला लागला. त्या प्रमाणपत्रामुळे मुलांना मोफत शिक्षण मिळायला लागले. मुलं नोकर भरतीत जाऊ लागले. अधिकारी बनत आहेत. फायदा झाला की नुकसान झाला हे माझ्या समाजाला माहीत आहे. विखुरलेला मराठा समाज एकत्र झाला आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मनीषा कायंदे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.