288 उभे करायचे की पाडायचे….; मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी दंड थोपटले?
Manoj Jarange Patil on Vidhansabha Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. उमेदवार उभे करणार की नाही? याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर महत्वाचं विधान केलं आहे. समाजासोबत बसून ठरवू की, 288 पाडायचे की, 288 उभे करायचे…, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. सगळे गुन्हे दाखल करावेत. अन्यथा बीड जिल्ह्यातला मराठा पुन्हा एकदा पेटून उठणार आहे. शंभूराजे देसाईंवर विश्वास ठेवून सरकारने आम्हाला 13 तारीख दिलेली आहे. तोपर्यंत वाट पाहू, सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅजेट आम्हाला 13 तारखेच्या आत पाहिजे. त्यानंतर समाजासोबत बसून ठरवू 288 पाडायचे की, 288 उभे करायचे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षणावर भाष्य
मराठा समाजाचे वेदना गृहमंत्र्यांना दिसणार नाही. गुन्हे दाखल केल्याने समाज घाबरेल असं त्यांना वाटतं. गावावर हल्ला करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. कुणबी प्रमाणपत्र बोगस म्हणून गुन्हा दाखल झाला की मंडळ आयोग चॅलेंज झाला समजा… कुणबी प्रमाण रद्द करून गुन्हे दाखल झाले की मग ओबीसी आरक्षणाला चॅलेंज होणार आहे. ओबीसीच्या बळावर घेतलेल्या नोकऱ्या, त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे. संपत्ती जप्त होणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
गोरगरिबांवर पूर्वीपासूनच अन्याय केला जातो. देवेंद्र फडणवीससाहेबांना यापूर्वी आम्ही सांगितलं होतं गोरगरिबांना त्रास देऊ नका. पूर्वीही लाखांवर गुन्हे मराठ्यांवर दाखल झालेत. आम्ही गृहमंत्र्यांना त्याचवेळी सांगितलं होतं की तुम्ही असल्यामुळे मराठ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. पण एक ही मराठा घाबरला नाही आणि खचला नाही… माधुरी गावात तोच प्रकार छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून सुरू केला आहे. आमचा सेम आहे ते राहू द्या. छगन भुजबळांच्या सांगण्यावरून स्वतःच्या गाड्या फोडून घेतल्या. लक्ष्मण हाके यांना मी विरोधक मानत नाही. धनगर समाजाला आम्ही विरोधक मानत नाही, असंही मनोज जरांगे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं आहे.
भुजबळांवर निशाणा
मराठ्यांविरोधात रोष पसरवतो तो छगन भुजबळ… सगळं कारणीभूत आहेत. गोरगरीब आमचे विरोधक नाहीत. छगन भुजबळ आणि पालकमंत्री यांच्या किमयावरून मराठ्यांवर गुन्हे दाखल झालेत. बीड जिल्ह्याचा पालकमंत्री जातिवाद करतो. असा पालकमंत्री असल्यावर कसं मराठ्यांवर अन्याय होतो हे पाहून मराठे शहाणे होतील. किती खोटे गुन्हे दाखल केले तरी बीड जिल्ह्याचा मराठा घाबरणार नाही. मात्र पालकमंत्र्यांच्या वागण्यामुळे बीड जिल्ह्यातला मराठा पुन्हा एकवटला आहे, असंही म्हणत मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.