जालना : शोलेस्टाईल आंदोलनांची कमी नाही. दरवर्षी शोलेस्टाईल (Sholey Movie) आंदोलनं पाहायला मिळतातच. या शोले स्टाईल आंदोलनाची सुरुवात ज्या धर्मेंद्रने केली, त्याच्यासारखं टॉवरवर चढत आंदोलन करणारा एक नवरा चांगलाच चर्चेत आलाय. जालन्यात या नवऱ्यानं बायकोसाठी टॉवरवर चढत आंदोलन केलं. माहेरी गेलेल्या बायकोला (Wife) परत आणा, अशी मागणी हा नवरा करत होता. ही घटना जालन्यातली आहे. दारु पिऊन अगदी तंतोतंत शोलेतल्या धर्मेंद्रप्रमाणे हा दारुडा नवरा बायकोचा विरह सहन न झाल्यानं टॉवरवर चढला होता. टॉवरवर चढून त्यांनी अख्ख्या गावाला वेढीस धरलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. तब्बल चार तास टॉवरवर चढून गोंधळ घालणाऱ्या या नवऱ्याला समजावताना अग्निशमन दलाच्या जवानांनी नाकी नऊ आले. घटलेला प्रकार पाहण्यासाठी आजूबाजूच्यांची गर्दी टॉवरभोवती जमली. या सगळ्या प्रकाराची अख्ख्या जालन्यात (Jalna News) आता चर्चा रंगलीय.
बायको माहेरी गेली की नवऱ्यांची मज्जाच असेल, असं गंमतीनं म्हटलं जातं. पण जालन्यातल्या एका नवऱ्याच्या बाबतीत मात्र अजबच प्रकार पाहायला मिळाला. माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी नवऱ्यानं चक्क शोले स्टाईल आंदोलन केलं. हा नवरा सध्या संपूर्ण जालन्यात चर्चेचा विषय ठरलाय.
जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील दाभाडीमध्ये नवऱ्याच्या शोलेस्टाईल आंदोलनानं सगळ्याचं लक्ष वेधलं. चक्क मोबाईलच्या टॉवरवर चढून हा नवरा माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी आंदोलन करत होता. माहेरी गेलेल्या बायकोला परत आणा, तसंच घरकूल द्या, अशी मागणी या नवऱ्यानं केलं. दारु पिऊन मोबाईलच्या टॉवरवर चढलेल्या या नवऱ्याचं नाव आहे, गणपत बकाल. टॉवरवर चढलेल्या गणपतच्या मागण्या ऐकून टॉवरच्या खाली एकच गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती.
यानंतर अखेर काही सजग नागरिकांनी अग्निशमनला कळवलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. पण त्यानंतरही काही लगेच हा गोंधळ निवळला नव्हता. तब्बल चार तासांनी अखेर दारु पिऊन टॉवरवर चढलेल्या गणपतला खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर सगळा गोंधळ निवळला. आता संपूर्ण जालन्यात या नवऱ्याची चर्चा तुफान रंगली आहे.