जरांगे पाटलांच्या बहीण आणि लेकीचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या, राज्यात लोकशाही नसून दडपशाही!
Manoj Jarange Patil Sister And Daughter on Maratha Reservation : जिजाऊंच्या लेकी पोलिसांवर हात उचलणार नाहीत, राज्यात लोकशाही नसून दडपशाही; मनोज जरांगे पाटलांच्या बहीण आणि लेक सरकारवर बरसल्या... काय म्हणाल्या? वाचा...
जालना | 13 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मागच्या 16 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कालपर्यंत मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण केलं. महाराष्ट्रातील अनेकांना त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अशातच जरांगे पाटील यांची बहीण आणि लेकीनं टीव्ही 9 मराठीशी बोलताना सरकारवर हल्लाबोल केलाय. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. त्याचसाठी माझे वडील लढा देत आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही आमची मागणी आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून चांगला निर्णय घेतला जावा, हीच अपेक्षा आहे, असं जरांगे यांची मुलगी म्हणाली.
मनोज जरांगे पाटील यांच्या बहिणीनेही मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागील तीन महिन्यांचा वेळ दिला होता. मात्र त्यांनी काहीही केलं नाही. आज 17 व्य दिवशी ते भेटीसाठी येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही राजकारण करत नाही. मात्र सरकारने दखल घ्यावी. आम्हाला आरक्षण द्यावं. जिजाऊंच्या लेकी पोलिसांवर हात उचलणार नाहीत. मात्र पोलिसांनी आमच्यावर लाठीहल्ला केलाय. माझ्या भावाच्या आंदोलनाला सरकार जबाबदार आहे. राज्यात सध्या चाललेली लोकशाही नसून दडपशाही आहे. आम्ही किती मोर्चे काढायचे. उद्या माझ्या भावाचे काही कमी जास्त झाल तर सरकार जबाबदार असेल, असं म्हणत जरांगे पाटील यांच्या बहीणीने सरकारवर निशाणा साधला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं. म्हणून आजच्या मोर्चात सहभागी झालो आहोत. आरक्षण नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. मराठा तरुणांना आवाहन आहे की, त्यांनी आत्महत्या न करता लढावं. सरकार फक्त आश्वासन देत आहे. आज मुख्यमंत्री उपमुख्य मंत्री भेटायला येणार की नाही हे माहिती नाही, असंही त्या म्हणाल्या.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला ठिकठिकाणाहून पाठिंबा मिळत आहे. बीडमध्ये मनोज जरांगे यांना ऑटो चालकांचा पाठिंबा मिळाला आहे. पाठिंबा देण्यासाठी ऑटो चालक आंदोलन स्थळाकडे रवाना झालेत. 100 ऑटो चालक रिक्षासह निघाले आहेत. सर्व रिक्षा चालक बीडच्या मंजरसुंभा इथले आहेत.
दरम्यान, पुणे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे उद्या अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. बाणेर ,बालेवाडी आणि औंध परिसरात उद्या कडकडीत बंद पाळण्यात येईल. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री याच्या व्हायरल क्लिपचाही आम्ही निषेध करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घ्यावा. जरांगे पाटील यांनी मुदत दिली आहे. त्यामुळे एक महिन्यात सरकार काय करतंय हे पाहावं लागणार आहे. मराठा समाजाला सरकार फसवत आहेत, असं यावेळी म्हणण्यात आलं.