महिनाभरात आरक्षण दिलं नाही तर…; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा
Manoj Jarange Patil Uposhan on Maratha Reservation : सकाळपासून दोन वेळा सरकारचं शिष्टमंडळ भेटलं, संभाजी भिडेंनी समजावलं अन् मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, म्हणाले, आरक्षण हा आम्हा मराठ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न.
जालना | 12 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मागच्या 15 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण आता अधिक तीव्र झालं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आतापर्यंत पाचवेळा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आज सकाळपासून दोनदा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटलं. यावेळी त्यांच्यासोबत संभाजी भिडे देखील होते. भिंडेंनीही हे उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. मराठा आरक्षण प्रश्न सुरू असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र झालं आहे. मनोज जरांगे यांची समाज बांधवांसोबत बैठक होत आहे. समोर उपस्थित सगळ्यांसोबत संवाद साधत ते आपला निर्णय घेत आहेत. यावेळी ते विविध मुद्द्यांवर भाष्य करत आहेत. आरक्षण हा आम्हा मराठ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सरकार महिनाभराचा वेळ मागत आहे. पण यात निर्णय झाला नाही तर मात्र तीव्र आंदोलन करू, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
एकूण विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. आपल्यात एक विचार आणि एक मत असलं पाहिजे. तुम्हाला सांगितल्या शिवाय मी माझे एक पाऊल उचलत नाही. मी पाणी आणि सलाईन घेतलं. पण सरकारच्या छाताडवर बसून राहिलो. माझं बोलणं झाल्यावर अंतिम निर्णय तुम्ही घ्यायचा आहे आहे, असं म्हणत जरांगे पाटील यांनी आपल्या संबोधनाला सुरूवात केली.
मी तुमच्या सोबत जशी चर्चा करत आहे तशी सरकार चर्चा करत आहे. सरकार चांगल्या चांगल्याला झुकत नाही. पण आपल्यापुढे झुकले. मराठा समाजाने तुमचा मान सन्मान माझ्या समाजाने वाढवला आता वेळ तुमची आहे. मराठा समाजाच्या पाठीमागे पहिल्यांदा सरकार उभे राहिले. ती मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं. ज्यांनी महिलांवर लाठीचार्ज केला ते सर्व निलंबित होणार आहेत. गाड्या अडवल्याने आरक्षण मिळणार नाही. इतर समाज अभ्यासपूर्ण आंदोलन करतो आणि आपल्या पदरात लाभ पाडून घेतो, असं मनोज जरांगे म्हणाले.
अहवाल काहीही येऊ द्या. महिन्यानंतर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे. जेवढे गुन्हा दाखल झालेले आहे ते मागे घ्यायचे. जोपर्यंत आरक्षणाचे पत्र शेवटच्या नागरिकांच्या हातात पडत नाही तो पर्यंत आंदोलन थांबणार नाही. काल सरकारच्या दोन बैठका झाल्या. सरकार काय प्रक्रिया करणार आहेत आणि कसे आरक्षण देणार आहे, हे सांगितलं पाहिजे.सरकारचे मत आहे आम्ही मराठ्याला टिकणारं आरक्षण देऊ. आपण 40 वर्ष दम धरला. मग एक महिन्यात टिकणारं आरक्षण कसं भेटणार? सरकार म्हणत आहेत एक महिना द्या. तुम्ही म्हणत असला तर देऊ, असं मनोज जरांगे म्हणाले.