Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार? काँग्रेस खासदाराचा मोठा दावा, त्या 50 लाख बहिणीत तुमचा तर नंबर नाही ना?
Ladki Bahin Yojana will be Closed : लाडकी बहीण योजना बंद होणार का? याविषयी सातत्याने धाकधूक लागली आहे. या योजनेत काल परवा 9 लाख बहिणी बाद झाल्या. त्यामुळे सरकारचे 1620 कोटी रुपये वाचले. आता ही योजना हळूहळू बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे.

लाडकी बहीण योजना सरकाच्या तिजोरीवर भार टाकत असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच करण्यात येत आहे. सुरुवातीला सरसकट असणारी ही योजना निकषाच्या जाळ्यात अडकत आहे. पूर्वी सर्वच लाडक्या बहिणी होत्या. तर आता गरजू बहिणींनाच योजनेचा लाभ देण्याचे प्रकार समोर येत आहे. या योजनेत काल परवा 9 लाख बहिणी बाद झाल्या. त्यामुळे सरकारचे 1620 कोटी रुपये वाचले. आता ही योजना हळूहळू बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
2100 रुपये कधी येणार?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दरमहा देण्यात आले. त्याचवेळी बहिणींना महायुतीचे सरकार आले तर 2100 रुपये देण्याचे भरभरून आश्वासन देण्यात आले. महायुतीमधील त्रिमूर्तिनी याविषयीच्या घोषणा अनेक प्रचार सभांमध्ये केल्या. पण याविषयीचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच निकष लावल्याने लाडक्या बहिणी हिरमुसल्या. त्यांचे यापूर्वीचे हप्ते वसूल करण्यात येत नसले तरी त्यांना भाऊरायकडून यापुढे ओवळणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.




खासदार कल्याण काळे यांचा दावा काय?
जालना येथील काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी मोठा दावा केला आहे. लाडकी बहीण योजनेतील निकषाची कसरत पाहता, ही योजना हळूहळू बंद करण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. 9 लाख लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात हा आक़डा 50 लाख इतका मोठा होणार असल्याचा दावा काळे यांनी केला. राज्यातील 50 लाख बहिणींना योजनेतून बाद करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. इतकेच नाही तर हळूहळू ही योजनाच गुंडाळण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारच्या तिजोरीतून मते खरेदी
ही लाडकी बहीण योजना नव्हती तर सरकारच्या तिजोरीतून मते खरेदी करण्याचा कार्यक्रम होता, असा खळबळजनक आरोपी ही डॉ. कल्याणराव काळे यांनी केला. आमच्या बहिणींना वाटलं की, योजना म्हणून हे पैसे दिले. पण ते मतांसाठी पैसे दिले होते. महायुतीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे आता समोर आल्याचे ते म्हणाले.