भाजप ईडीचा बटिक म्हणून वापर करतेय; ठाकरे गटाच्या नेत्यानं भाजपची कारस्थानं सांगितली
अंबादास दानवे यांनी ज्या प्रमाणे भाजपवर टीका केली आहे, त्याच प्रमाणे त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जालना : श्रावणबाळ अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर येथील संताजी घोरपडे साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणी त्यांच्या घरावरही दुसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे. तर कोलकाता येथील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटी रुपयांची घोटाळा केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यावरून आता राज्यातील राजकारण आता ढवळून निघाले आहे. त्यावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत ईडीच्या कारवाईबद्दल टीका केली आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीन धाड टाकल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर भाजप आणि विरोधकांनी टीका टिप्पणी केली असली तरी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र केंद्रावर सडकून टीका केली आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेली ईडीची कारवाई म्हणजे ही भाजप ईडीचा बटिक म्हणून कसा वापर करते आहे त्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची जहरी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, ईडी ही स्वतंत्र संस्था आहे. मात्र भाजप ईडीचा गैरवापर करत आहे. विरोधकांना नेस्तानाबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून प्रयत्न केले जात आहेत, परंतु त्यांना त्यामध्ये यश येणार नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
अंबादास दानवे यांनी ज्या प्रमाणे भाजपवर टीका केली आहे, त्याच प्रमाणे त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ईडी कुणावर धाड टाकणार आहे, ती धाड कधी पडणार आहे याची माहिती अगोदर किरीट सोमय्यांकडे येतेच कशी असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे सदा सरवणकर यांनी केलेल्या गोळीबारबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याप्रकरणी सदा सरवणकर यांच्या विरोधात सभागृहात आवाज उठवण्याचा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे.
रिव्हॉल्व्हरमधून गोळी सरवणकरांनी झाडली नसेल तर त्यांना रिव्हॉल्व्हर दुसऱ्याकडे देण्याचा काय अधिकार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे याप्रकरणी कोणता ना कोणता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे-अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली आहे.कारण गोळी त्यांच्याच रिव्हॉल्व्हर मधून झाडली गेली आहे हे सिद्ध झालं आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.