Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय? मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपासहित महायुतीवर निशाणा साधला. सध्या अनेक जण हिंदू खतरे में आहेत, असे म्हणतात. मग मराठ्यांचं काय? असा सवाल त्यांनी केला. मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलंच माहिती असल्याचे ते म्हणाले.
राज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील सभेत बटोगे तो कटोगे, असा नारा दिला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात, राज्यातील पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला. हिंदू खतरे में है असा सूर आळवण्यात येत आहे. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपासह महायुतीवर निशाणा साधला आहे. हिंदू खतरे में है आहे तर मग मराठ्यांचं काय? असा रोकडा सवाल त्यांनी केला. मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलंच माहिती असल्याचे ते म्हणाले.
हेच लोक मराठा आरक्षण विरोधी
जे लोक हिंदू खरते में है, असा नारा देत आहेत. तेच लोक महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजपा आणि महायुतीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार तयार आहेत. यांच्यामुळे प्रत्येक वर्ग त्रासाला गेल्याचा आरोप त्यांनी भाजपावर केला. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपा आणि महायुतीवर हल्लाबोल केला.
मराठ्यांचा वापर केला
जे हिंदू एकतेच्या बाता मारत आहेत. याच लोकांनी अल्पसंख्यांकांना निशाणा करण्यासाठी मराठ्यांचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. पण जेव्हा मराठा समाजाने त्यांच्या हक्काची, अधिकाराची मागणी केली, तेव्हा त्यांनी झिडकारलं. जर हिंदू धोक्यात असेल तर या लोकांनी मराठ्यांची स्थिती ठीक करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जेव्हा आम्ही आरक्षणाची मागणी करतो, तेव्हा मराठ्यांना हिंदूविरोधी असल्याचे ठरवता तर मुस्लिमांवर निशाणा धरतात, तेव्हा आमची गरज पडत असल्याचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केली.
हिंदूंचे विभाजन कोण करणार?
भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, या दोन्ही घोषणावर जरांगे पाटील यांनी टीका केली. हिंदूंचे विभाजन कोण करणार आहे, असा सवाल त्यांनी केला. राज्यात मराठा ही हिंदूमधील सर्वात मोठा समाज आहे. आम्ही आमच्यातील वाद सहज संपवू शकतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदुत्वाचे पालन करणारी लोक आहोत. आम्ही आमचं रक्षण करू शकतो. तुम्ही तुमचे काम करा, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.