मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, काय कमावलं काय गमावलं?; जरांगेंची सविस्तर प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil on 1 Year of Maratha Reservation Andolan : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालंय. या वर्षपूर्तीनिमित्त मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्ही बातचित केली. तेव्हा या आंदोलनबाबत त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली, वाचा...
एक वर्षभरापूर्वी एक लढा सुरु झाला. हा लढा होता हक्कासाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरले. त्यांनी लढा सुरु केला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. जरांगे पाटील यांनी ज्या ठिकाणापासून आंदोलन सुरू केले होतं त्या ठिकाणी भेट दिली. तेव्हा त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनावर जरांगेंनी भाष्य केलं.
जरांगेच्या आंदोलनाची वर्षपूर्ती
मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मनोज जरांगे यांनी अंबड तालुक्यातील ज्या पैठण फाट्यावर सभा घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून शड्डू ठोकला होता त्याठिकाणी जरांगे यांनी आज भेट दिली. याच ठिकाणी जरांगे यांनी छगन भुजबळ यांना आव्हान दिले होतं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार, नाहीतर नाव सांगणार नाही आणि मराठा आरक्षणात छगन भुजबळ यांनी जो खुटा रोवला आहे तो उपटणार, अशी शपथ मनोज जरांगेंनी घेतली होती.
काय कमावलं? काय गमावलं?
एक वर्ष आंदोलन केलं. त्यामुळे पदरात काय पडलं याचा विश्लेषण आज होईल. त्यामुळे बैठक बोलावली आहे. या ठिकाणी जो उठाव झाला, तो ऐतिहासिक होता. या भूमीने महाराष्ट्रातील अन्याय अत्याचार होणाऱ्या जनतेला वाचा फोडण्याचे काम केलं. समाज एकत्र करणं खूप गरजेचं होतं. यातून सर्वात महत्त्वाचं काय मिळालं. तर माझ्या समाजाला तिरस्कारान बघितलं जायचं तो समाज एकत्र आला आहे आणि आज सर्वात मोठा आनंद आमच्यासाठी आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
जरांगे काय म्हणाले?
आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. याचं शहागडमधून एक वर्षांपूर्वी आंदोलन केलं होतं मागचे दिवस विसरून चालणार नाही. आपण जमिनीवर राहिले पाहिजे. म्हणून आज पुन्हा एक वर्षानंतर या जागेवर आलो आहोत. याचा सर्व श्रेय मराठा समाजाला जाईल. एका वर्षात ज्या ज्या मागण्या केल्या आहेत. त्यात काय काय मिळालं, याचा विषय आणि चर्चा बैठकीत होणार आहे. आम्ही जर एकजूट राहिलो तर मराठा समाज काहीही मिळू शकतो. एखादी मागणी उशिरा पूर्ण होईल. मात्र एकजूट आपण सोडली नाही पाहिजे, असं मनोज जरांगे टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.