ओवैसींसोबत आघाडी करण्यासाठी मनोज जरांगे सकारात्मक; म्हणाले, प्रकाश आंबेडकर जर…
Manoj Jarange Patil on Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काल केलेल्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते या आघाडीसाठी सकारात्मक असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. मनोज जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...
काल छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी हात पुढे केला. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. समदु;खी लोकांनी एकत्रित यावं. भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी माझ्यासोबत एकत्रित येतील का? हे मला माहित नाही. मात्र माझं मत आहे एकत्र यावं बदल घडेल. तुम्ही नाही आले तर आम्ही यांना पाडायला मोकळे आहोत. मी प्रस्ताव फ्रस्ताव देण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र सर्वांनी एकत्र यावं असं मला वाटतं. प्रश्न समाजाचा आहे सर्वांनी उडी घ्यायची जास्त विचार करायचं नाही. जे होईल ते होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले?
प्रस्तावाचं मला काय कळतंय, आपण समान दुःख असणारे बांधव आहोत. दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगर , इतर समाज आपण सगळे समविचारी आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन दणका द्यायचा आहे. एकत्रित यायला समाज कुठेही म्हणला नाही. मला काही नेते माहीत नाहीत. सगळे एकत्र आल्यास सगळ्या समाजाला न्याय मिळेल. नेत्यांना आवाहन करण्यापेक्षा सामान्यांनी एकत्र यावं. आपण सत्ता परिवर्तन करू शकतो. 20 तारखेपर्यंत आम्ही पाहणार आहोत कसं जुळते काय जुळतं ते… फोनची वाट पाहण्यापेक्षा आपलं समाज कसा मोठा होईल, यासाठी एकत्र यायला हवं, असं मनोज जरांगे म्हणाले.
सगळे समाज एकत्र आले तर जातीवाद बंद होईल. स्वतःहून यावं. आपली जात मोठी होईल. एकत्र या कल्याण होईल… निमंत्रण देण्यापेक्षा आपण स्वतःहून एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांना मदत करून मतदान करून जात मोठी करायची आहे, असंही जरांगे म्हणाले.
ओवैसी काय म्हणाले होते?
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगेंसोबतच्या आघाडीवर भाष्य केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आला. तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करेल. मनोज जरांगे यांच्यामुळे पंकजा मुंडे बीड लोकसभा निवडणुकीत पडल्या. त्यांना विजय मिळता आला नाही. मग मुस्लिम उमेदवार का जिंकत नाहीत? महाराष्ट्र 11 टक्के मुस्लिमसाठी दुःख आहे. त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर नक्की बोलू, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते.