मनोज जरांगे पाटलांचं ठरलंय, आता माघार नाय…; मराठा आरक्षण आंदोलन अन् रॅलीचं टाईमटेबल
Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. अशातच आता त्यांनी पुढच्या आंदोलनाची दिशा आणि रॅलीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठीचा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. वाचा...
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. आता त्यांनी अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुकारलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा काय असेल यावर भाष्य केलंय. आमचे आंदोलन शांतपणे राहणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे हे आमचे ध्येय आहे. 13 जुलै पर्यंत सरकारने वेळ घेतला आहे आणि शंभूराज देसाई हे आम्हाला न्याय देतील आम्हाला विश्वास आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडवणीस आणि अजित पवार हे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण आणि आम्ही ठरवल्या प्रमाणे देणार आहेत. आम्ही शांतता रॅली ठेवली आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व मराठा समाज एकत्र येणार आहे. आरक्षणासाठीची मागणी करण्यासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
कोणत्या दिवशी कुठे रॅली असेल?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रॅली काढणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. 6 तारखेला हिंगोली, 7 तारखेला पराभणी, 8 तारखेला नांदेड, 9 तारखेला लातूर, 10 तारखेला धाराशिव, 11 तारखेला बीड, 12 तारखेला जालन्यात आम्ही रॅली काढणार आहोत, असं जरांगेंनी सांगितलं.
निवडणुकीबाबत मनोज जरांगे काय म्हणाले?
13 तारीख सरकारने जरांगे पाटील यांना दिल्यानंतर हा दौरा आहे. मी राजकारणात येणार नाही. पण नाही दिले तर पर्याय काय? आम्ही राजकारण करणार नाही. पण 288 ठिकाणी उमेदवार देणार आहोत. 24 ठिकाणी मी माहिती घेतली. दुसऱ्या टप्प्यात 83 ठिकाणी माहिती घेणार आहे.उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ या ठिकाणी आम्ही विधानसभा मतदार संघ बघितले आहेत. आम्ही टप्प्या टप्प्याने 288 ठिकाणी उमेदवार बघणार आहोत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन मुस्लिम, लिंगायत बारा बलुतेदार यांना राजकीय प्रवाहात आणणार आहोत. आमची चाचपणी सुरू आहे. मराठवाड्यामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती आहे. राजकारणात समाज दिसणार मी दिसणार नाही. मी समाजाला धोका देणारा नाही. समाजाशी गद्दारी करणाऱ्याची माझी पैदास नाही. पण सरकारने नाही दिले तर मी काय करू, सत्तेत जावं नाही तर काय करावं. सत्तेत जाऊन आपली लेकरं सुधरवली पाहिजेत. आपण आता देणारे बनायचं आहे, असं मनोज जरांगे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.