आमच्या जीवावर कुणाचा डाव असेल…; मनोज जरांगेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर
Manoj Jarange Patil on Prakash Ambedkar : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा बोलताना मनोज जरांगे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा...
मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं नकली भांडण सुरु आहे. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. ठरवून झालेलं भांडण आहे, असं प्रकाश आंबेडकर काल म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. आरोपाला मी कुठपर्यंत उत्तर देत बसू. माझं काम गोरगरिबांसाठी आहे आणि ते कायम सुरू ठेवणार आहे. पण आमच्या जीवावर निवडून यायचा कुणाचा डाव असेल तर तो आम्ही यशस्वी होऊ देत नाहीत, असं मनोज जरांगे म्हणालेत.
प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर
आमचे ध्येय ओबीसीतून आरक्षण मिळवण्याचं आहे. पुढे काय करायचे ते आम्ही 29 ऑगस्टला ठरवणार आहोत. आम्हाला आमचे लेकर मोठे करण्याची वेळ लागले आहे आणि आम्ही ते करणारच आहे. सरकारने कितीही ट्रॅप लावले तरी मी हटत नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची आहे ते माझं स्वप्न आहे. समाज मोठा होऊ नये हे अनेकांचं स्वप्न आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर माझा विश्वास बसत नाही. तिसऱ्या आघाडीत जायचं की आणखी काय करायचं याबाबत 29 ऑगस्टला निर्णय घेऊ. तुम्हांला 29 ऑगस्टला सांगतो. धनगर मराठ्यांना मोठं करण्याची एवढीच संधी आहे. पंकजा मुंडे यांच्या बाबतीत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी देत नाही, असंही मनोज जरांगे म्हणालेत.
आरक्षणाबाबत ठाम भूमिका
माझा मराठा शांत आहे आणि शांत राहणार आणि आरक्षणही मिळवणार आहोत. फक्त तेवढं छगन भुजबळला सांगा, त्याला दंगली घडवण्याचा नाद आहे. तो तुमच्या ताटात खातो त्यामुळे तुम्ही त्याला सांगा… मराठे शांत आहेत. बाकीच्यांचे मला माहित नाही, यंत्रणा तुमच्याकडे आहे. सत्ताधारी विरोधकांनी काहीतरी करून आम्हाला वेड्यात काढू नका. आम्ही आरक्षण घेत असतो आणि तेही ओबीसीतूनच घेत असतो, असं मनोज जरांगे म्हणालेत.