मतदानाच्या आदल्या दिवशी मनोज जरांगेंचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन
Manoj Jarange Patil on Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे. तसंच कालिचरण महाराज यांनी केलेल्या विधानावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...
महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होत आहे. उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी tv9 मराठीशी बोलत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे. मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा, आपल्या हाल- अपेष्टा डोळ्यासमोर ठेवा. वेळेवर भावनिक होऊ नका. हा माझा नेता हा माझा नेत्याचा मुलगा आणि त्याला मतदान करावंच लागेल, असं न करता तुमचे कष्ट डोळ्यासमोर समोर ठेवा. तुम्ही विचार नाही केला तर कधी मोठे होणार आहात. विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मनोज जरांगेंचं मराठा समाजाला काय आवाहन
श्रीमंत मराठे, नौकरी करणारे मराठे, उद्योजक, अनेक लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी आपल्या मुलांना विचारा. मी लोकसभेला सांगितले होते, कोणाला पडायचे त्याला आणि कोणाला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, आणि विधानसभेला पण तेच सांगत आहे. मी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि माझी कुठेही टीम पाठवली नाही. मी महाराष्ट्रमधील कोणत्याही मतदार संघातील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मी कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मराठ्यांनी एकजुटीने 100 टक्के मतदान करा. पण ज्याने आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे. त्यांना सोडू नका. राजकारणापेक्षा मला आरक्षण महत्वाचे आहे, आणि ते मी मिळवून देणार आहे. मराठ्यांनी संभ्रम ठेवू नये. मी कोणालाही काही सांगितले नाही आणि शेवटपर्यंत सांगणार नाही. कोणाचेही सरकार आले तर आपल्याला लढावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
कालिचरण महाराज यांच्या विधानावर काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील म्हणजे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस, असं कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. त्यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. हे महाराज कुठून मध्येच आलेत? स्टॅम्पवर असल्यासारखी टिकली लावतो. आम्ही मराठ्यांनी याचे काय वाटोळे केलं आहे. तुला काय घेणं-देणं आहे. माझे माय बाप कष्ट करतात. आमच्या मराठ्यांच्या जीवावर तू पाकिटं खातो. ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्यांच्या घरी जाऊ बघ. मराठ्यांची तू का टिंगल करतो. मीठ कालवून शेण खा तिकडे.. तू काय महिलांबद्दल आदर आहे. सुंदर महिला भोगून घ्या म्हणत.. तुझे छप्पर फोडायला पाहिजे. ज्याचा मराठा द्वेष करतात त्या बंगल्यावरच्या वरून बोलतो. तू खेकडे खाऊन जगणारा महाराज, आमच्या नादी कशाला लागतो, असं जरांगे म्हणालेत.