Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; विधानसभेला नको डोकेदुखी; फटका बसू नये म्हणून मनधरणी? चर्चा मराठा फॅक्टरची
Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
लोकसभा निकालानंतर मराठा फॅक्टरची चर्चा रंगली. लोकसभेत भलभल्यांना या फॅक्टरने हाबाडा दिला. विविध विधानसभा मतदारसंघावर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दावा केला आहे. या पक्षांमध्ये अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे. एकाच मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत. तिकिट मिळाले तर ठीक नाही तर बंडाचा झेंडा फडकवण्यासाठी अनेकांचा हात शिवशिवत आहेत. लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली आहे. दसऱ्या मेळाव्यात ही अनेक इच्छुकांची भाऊगर्दी दिसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
नारायणगड येथील दसरा मेळाव्याची तयारी जोरात सुरू आहे, 12 तारखेला दसरा मेळावा आहे. परंतु, 11 तारखेपासून नारायण गडावर जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. गडावर जाणाऱ्या रस्त्यावरही जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जातिवंत मराठा समाज इतर कुठल्याही मेळाव्याला जाणार नाही, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंबाजोगाई आणि केज मतदार संघातून भरपूर कार्यकर्ते या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जरांगे पाटील यांना दिली.
कुठलीही राजकीय चर्चा नाही
12 तारखेला मनोज जरांगे यांचा जो दसरा मेळावा होणार आहे त्या अनुषंगाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली आहे. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आहे आणि मला अपेक्षा आहे की ते केज अंबाजोगाई मतदारसंघातून मला त्यांच्याकडून उमेदवारी मिळेल आता जरांगे पाटील यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही मात्र येणाऱ्या काळात काही गोष्टी सकारात्मक घडतील अशी अपेक्षा आहे असे अंजली घाडगे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला ही गोष्ट योग्यच झाली, असं माझं मत आहे, जरांगे पाटील यांच्यामुळे सर्व बहुजन हिंदू, मुस्लिम, दलित एकत्र आले आणि ही चांगली गोष्ट आहे, असे मत घाडगे यांनी व्यक्त केले.
दानवे-खोतकर समर्थक पण भेटीला
रावसाहेब दानवे यांचे समर्थक भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेश राऊत, माजी नगरसेवक संध्या देठे यांचे पती संजय देठे आणि अर्जुन खोतकर यांचे समर्थक, माजी नगर सेवक विष्णू पचफुले यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. एकीकडे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या मध्ये राजकीय टीका टिप्पणी होत असताना या दोघांच्या समर्थकांनी जरांगे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.