आता सरकारने बेईमानी करू नये, नाहीतर… मनोज जरांगेंचा तो खणखणीत इशारा
Manoj Jarange Patil Antarwali Sarati : प्रजासत्ताक दिनापूर्वीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. यापूर्वी दीड वर्षे त्यांचे मोर्च, उपोषणाने राज्य ढवळून निघाले होते. जरांगेंचे हे 7 वे उपोषण आहे.

प्रजासत्ताक दिवसापूर्वीच मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार बाहेर काढलं आहे. मागण्या जुन्याच आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी आता बेईमानी केली तर समाज आता सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आज पहिला दिवस आहे. यानंतर आपली तब्येत बिघडली तर मग प्रचंड गर्दी होईल, असे त्यांनी सरकारला बजावले. सगेसोयरे अध्यादेश, सरसकट ओबीसी प्रमाणपत्र या जुन्या मागण्यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. जरांगेंचे हे 7 वे उपोषण आहे.
मग राज्यभर लोण पसरणार
सरकारने आमच्याशी बेईमानी करू नये. आमच्या मागण्या मान्य करा. आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पसरणार आहे, असे जरांगे म्हणाले. हे सामूहिक उपोषण आहे. ज्यांना बसायचे बसा. कुणालाही जोर जबरदस्ती नाही. घरच्यांचा विरोध असेल तर बसू नका. मी एकटाच खंबीर आहे, असे ते म्हणाले.




आपल्या पहिल्या दिवसाच्या उपोषणाला प्रचंड गर्दी झाली आहे. पूर्वी माझी तब्येत खालावल्यावर लोक भेटायला यायचे. आज पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी झाली. हे पहिल्यांदाच घडलं आहे. सरकारशी उपोषणापूर्वी बोलणं झालं नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठ्यांशिवाय गुलाल नाही
विधानसभेतील निकालाकडे बोट दाखवत, मराठा समाजामुळे विजय मिळाल्याची आठवण त्यांनी करून दिली. मराठ्यांशिवाय गुलाल उधळू शकत नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाशी बेईमानी करणार नाहीत, असे वाटते. त्यांना ही मोठी संधी आहे. त्यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे की नाही हे दिसून येईल. तर जे मराठे सत्तेत आहेत, त्यांची भूमिका पण समोर येईल असे ते म्हणाले.
जरांगे पाटील यांच्या मागण्या काय?
आंदोलनातील गुन्हे मागे घ्या. सरकारने आश्वासन दिलंय. हैदराबाद गॅझेट, सातारा, बॉम्बे, आणि औंध सरकारचं गॅझेट फडणवीस सरकारने ताबडतोब लागू करा. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांना निधी दिला नाही. त्यांना नोकरीत सामावून घेतलं नाही. ते तातडीने करा. ८ ते ९ मागण्या केल्या. त्या जुन्याच आहे. एकही नवीन मागणी नाही. सरकारला माहीत आहे. या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा, अशा मागण्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.