मनोज जरांगे पाटील यांचा शिंदे सरकारला सर्वात मोठा इशारा, पाहा नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. पण तरीही त्यांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. विशेष म्हणजे सरकारला त्यांची मनधरणी करण्यास तीनवेळा अपयश आलं आहे.
जालना | 9 सप्टेंबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिलाय. मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. जवळपास अडीच तास ही चर्चा झाली. त्यानंतर हे शिष्टमंडळ जालन्याला परतलं. या शिष्टमंडळाची जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर आज सरकारचा एक बंद लिफाफा घेऊन जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले.
अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांना सरकारकडून आलेला बंद लिफाफा दिला. जरांगे पाटील आणि खोतकर यांनी हा लिफाफा उघडला. या लिफाफ्यात जरांगे पाटील यांच्यासाठी एक मेसेज होता. पण तो लिफाफा वाचल्यानंतरही मनोज जरांगे यांनी आपण उपोषण मागे घेणार नाही, असं जाहीर केलं.
मनोज जरांगे उपोषणावर ठाम
सरकारकडून 7 सप्टेंबरला जीआर काढण्यात आलेला. त्या जीआरमध्ये आम्ही दुरुस्ती सुचवली होती. संपूर्ण मराठा समजाला सरसकट कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळावं, अशी आमची मागणी आहे. सरकारच्या जीआरमध्ये असा स्पष्ट उल्लेख होत नाही, तोपर्यंत आपण आरक्षण मागे घेणार नाही, असं जरांगे पाटील यांनी जाहीर केलं.
विशेष म्हणजे यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारने आतापर्यंत आपाल्या कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या नाहीत याची यादीच सांगितली. इतका मोठा भ्याड लाठीचार्जचा हल्ला झाला. पण लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पेक्षा बडतर्फची कारवाई व्हायला हवी होती. गोळीबार करणारे मुंबईत शिष्टमंडळासोबत फिरताना दिसले. कारवाई करावी की नाही, ती सरकारने ठरवावं. पण आमच्यावरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
जरांगे पाटील यांचं कार्यकर्त्यांना मोलाचं आवाहन
सरकारने 2004 चा जीआर काढला होता. या जीआरचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. तसेच सरकारच्या जीआरमध्ये आता थोडीशी दुरुस्ती राहिली आहे ती त्यांनी करुन द्यावी, असं जरांगे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं. तसेच कुणाविषयीदेखील द्वेषाची भावना ठेवू नका, असं जरांगे यांनी सांगितलं.
जरांगे पाटील यांचा इशारा काय?
यानंतर अर्जुन खोतकर मनोज जरांगे यांचा मेसेज घेऊन उपोषणस्थळाहून निघाले. 80 टक्के काम झालं आहे, आता 20 टक्के काम राहिले आहे, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली. त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. उद्यापासून पाणी आणि औषध घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली.