जालना | 4 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्याआधी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तीनही मंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडली. जालन्यातील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी आरक्षण द्यावं अशी मागणी केलीय. याबाबत मुख्यमंत्री आज मोठी घोषणा करतील, असं वाटत होतं. पण मुख्यमंत्र्यांनी याबाबत ठोस भूमिका केली नाही. त्यानंतर आता मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या. तुम्ही चर्चेचं दार खुलं केलं असं म्हणून पहिलेच पाढे बोलू नये. त्यामुळे सरकारने आमचं आरक्षण जाहीर केलं असेल, सरकारने शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल, सरकारने शंभर टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला असेल. कारण त्याठिकाणी छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले देखील होते. सरकारचं शिष्ठमंडळ येताना मराठा आरक्षणाच्या विजयाचं पत्र घेऊन येईल”, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
“सरकारचं शिष्ठमंडळ जीआर घेऊन येतंय. आम्ही त्याची वाट पाहतोय. पण जीआर आला नाही तर आंदोलन मागे घेणार नाही. जीआर आलं नाही तर उद्यापासून पाणी सुटलं ते समजा. सरकारच्या प्रतिनिधीची वाट बघेन. त्यानंतर मी अधिकृत भूमिका जाहीर करेन. आम्ही आता अधिकृत असं काहीच बोलू इच्छित नाही. पण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा जीआर घेऊनच सरकारचं शिष्टमंडळ येईल”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“सरकारला दोन दिवसांचा वेळ आहे. मराठा घाबरलेला नाही. प्रत्येकाच्या कनाकनात ऊर्जा आहे. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेव्हाच थांबणार. त्यांचं शिष्ठमंडळ येतंय अशी माहिती मिळाली आहे. या शिष्टमंडळाने माहिती दिल्यानंतर आमची गावकऱ्यांसोबत बैठक पार पडेल. या बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल”, अशी माहिती मनोज जरांगे यांनी यावेळी दिली.