Manoj Jarange Patil | सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेण्याची शक्यता, पण…
मनोज जरांगे पाटील यांनी आज भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काही सूचक वक्तव्ये केली आहेत. उपोषण मागे घेतलं तरी आंदोलन सुरुच राहील, असं मनोज जरांगे पाटील स्पष्ट म्हणाले आहेत. मनोज जरांगे आता उपोषण मागे घ्यायला तयार आहेत. पण त्यांनी सरकारसाठी पाच अटी ठेवल्या आहेत.
जालना | 12 सप्टेंबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज भूमिका मांडली. मनोज जरांगे जालन्यातील अंतरवली सराटी गावात गेल्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकारकडून सातत्याने त्यांना विनंती करण्यात येत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत एक जीआरही काढला. पण त्या जीआरमध्ये जुन्या कागदपत्रांमध्ये कुणबी वंशावळ असा उल्लेख असणाऱ्या नागरिकांना मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यात येईल, असं म्हटलं आहे. पण ज्यांच्याकडे कुणबी वंशावळ अशा कागदपत्रांचे पुरावे नसतील त्यांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढत चालला होता. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने तीनवेळा त्यांची भेट घेतली. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सातत्याने उपोषणस्थी जावून त्यांची भेट घेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
समिती एक महिन्यात अहवाल सादर करणार
मनोज जरांगे मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम आहेत. तर दुसरीकडे सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्त न्याधीशांच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती हैदराबादला जावून जुन्या नोंदणींची चाचपणी करणार आहे. त्यानंतर एक अहवाल शासन दरबारी सादर करणार आहे.
समितीच्या संशोधनाला आणि अहवाल सादर करण्यास एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकार मनोज जरांगे यांच्याकडे सातत्याने एक महिन्याचा वेळ मागत आहे. पण मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी काल औषध घेण्यासही नकार दिला. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. अखेर सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलवत या विषयावर मार्ग काढण्यावर चर्चा केली.
सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं?
सर्वपक्षीय बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेऊन राज्य सरकारला एक महिन्याचा कालावधी द्यावा, असं एकमत झालं. त्यानंतर आज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा समाजाच्या बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण उपोषण सोडलं तरी उपोषणस्थळी तळ ठोकून राहू. आंदोलन सुरुच राहील, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच 12 ऑक्टोबरला मोठा मेळावा होईल, असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
मनोज जरांगे यांचा सरकारला मेसेज काय?
मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्व मंत्रिमंडळ, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलावलं आहे. हे सर्वजण आले तर आपण उपोषण सोडू, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे त्यांनी सरकारपुढे पाच अटी ठेवल्या आहेत. त्या पाच अटी सरकारने मान्य कराव्यात, असं मनोज जरांगे आपल्या भाषणात म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या पाच अटी नेमक्या कोणत्या?
1) अहवाल कसाही येवो, मराठा समाजाला तिसऱ्या दिवशी पत्र वाटप करावे
2) महाराष्ट्रामध्ये जेवढे गुन्हे दाखल झाले ते परत घ्यावे
3) लाठीचार्ज करणारे पोलीस अधिकरी निलंबित झाले पाहिजेत
4) उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आणि छत्रपती संभाजीराजे यांनी यावं
5) सरकारच्या वतीने सर्व लिहून दिले पाहिजे