‘…तर पंतप्रधानांच विमान मराठ्यांनी शिर्डीला उतरुच दिलं नसतं’, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान

| Updated on: Oct 27, 2023 | 11:45 AM

Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात शिर्डी येथे आले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी मराठा आरक्षणाविषयी काहीही भाष्य केलं नाही. यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी आपल मत, भावना व्यक्त केल्या.

...तर पंतप्रधानांच विमान मराठ्यांनी शिर्डीला उतरुच दिलं नसतं, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान
Manoj jarange patil-Pm Modi
Follow us on

जालना : “मराठा समाजाला अपेक्षा होती. परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना आरक्षणाबाबत काही सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण त्यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाचा लढा पंतप्रधानांना सांगितलेला नाही अशी शंका आहे. जर पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत सांगितलं असेल, तर पंतप्रधान जाणूनबुजून आरक्षणावर बोलले नाहीत असं समजायचं का? याची शंका आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी काल मराठा आरक्षणाचा विषय घेतला नाही. याचा अर्थ त्यांना सांगितलं नाही. सांगितलं असेल तर त्यांनी जाणूनबुजून हा विषय घेतला नाही. ही शंका आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“पंतप्रधांनाना गोरगरीबांची गरज राहिली नाही असा त्यातून राज्यातील जनता अर्थ काढत आहे. पंतप्रधानांनी काल विषय घ्यायला हवा होता. पण दोन्ही बाजूच्या चर्चा सुरू आहेत. एक तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून सांगितलं नाही. किंवा पंतप्रधानांना सांगितलं पण त्यांनी जाणूनबुजून आरक्षणाचा विषय घेतला नाही. या दोन्ही शंकापैकी एक शंका मराठ्यांच्या मनात शंभर टक्के आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांच्या मनात पाप नव्हतं’

“इतक्या जवळ येऊन पंतप्रधान देशव्यापी आंदोलनाची दखल घेत नाहीत, याचा अर्थ त्यांना सांगितलेलं नाही किंवा त्यांनी तो विषय घेतला नाही. त्यांनी विषय घेतला काय आणि नाही घेतला काय? मराठ्यांना फरक पडत नाही. पण समाज यासाठी शांत होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि राज्य सरकारला या विषयावर मार्ग काढायला सांगितला. मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांच्या मनात पाप नव्हतं. वाईट नव्हतं. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्या विषयी वाईट भावना असतील तर मराठ्यांनी त्यांचं विमानही शिर्डीला उतरू दिलं नसतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘….पण त्यांच्याविषयी वाईट भावना नव्हती’

“मराठ्यांच्या मनात काहीही वाईट भावना नव्हती. असती तर मराठ्यांनी पंतप्रधानांचं विमान वरचेवरच परतवून लावलं असतं. शिर्डीला खालीही उतरू दिलं नसतं. पण त्यांच्याविषयी वाईट भावना नव्हती. चांगली भावना होती. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तिघे आरक्षणाचा शंभर टक्के विषय हाताळतील अशी आशा होती. पण त्यांना गरज राहिली नाही हा संदेश राज्यात गेला” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.