…तर लालू हेल्यावर बसून आलेच समजा; रावसाहेब दानवे यांची तुफान बॅटिंग
Raosaheb Danve On INDIA Alliances : लोकसभेच्या फडात काही राजकीय नेत्यांची भाषणं फारच भाव खावून जातात. त्यांच्या खास शैलीने जो काही माहौल तयार होतो. जो काही हश्या पिकतो, त्याला सर येत नाही. मराठवाड्यातील नेते रावसाहेब दानवे यांच्या खुमासदार भाषणाची सध्या चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. काही जण जहरी टीका करत आहेत. तर काही त्यांच्या खुमासदार भाषणांनी सभेत हश्या पिकवत आहेत. काही नेते एकमेकांना चिमटे काढत आहेत. लोकसभेच्या धामधुमीत शेरो-शायरी, कवितांचा पण पूर आला आहे. अनेक नेते किस्से सांगून मतदारांना खिळवून ठेवत आहेत. आपल्या खुमासदार शैलीसाठी भाजप नेते रावसाहेब दानवे ओळखले जातात. त्यांनी जालन्यात केलेल्या भाषणामुळे प्रचाराला चांगलीच रंगत आली. त्यांच्या तुफान फटकेबाजीमुळे यावेळी एकच हश्या पिकाला. जालना
तर लालू हेल्यावर आलेच म्हणून समजा
त्यांनी इंडिया आघाडी-महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. चेहरा नसलेली आघाडी मते मागत आहे, त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. ममता दीदी म्हणाली मी पंतप्रधान, तर लालू हेल्यावर बसून आलेच समजा, असा चिमटा त्यांनी काढला. आघाडीचे सरकार चालत नाही. कुण्या एकाचे सरकार पाहिजे असा टोला त्यांनी इंडिया आघाडीला लगावला.
कल्याण काळे यांच्यावर टीका
ज्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही, पंतप्रधान पदाचा चेहरा नाही असे लोक मते मागतात, अशी टीका त्यांनी प्रतिस्पर्धी कल्याण काळे यांच्यावर केली. कल्याण काळे यांनी रस्ते विकासावर बोलावे. मी सहा हजार कोटी रस्त्यासाठी आणले, तुम्ही श्रीमंतीवर बोलू नका केंद्राने विविध योजनांसाठी निधी दिला. काँग्रेसने विकासावर बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. मी खोटा ठरलो तर उठ बशा काढेल, असे ते म्हणाले.
मी सासू तर या सुना
मी जालन्याचा तर जालना माझे आहे. मी एका छोट्या गावाचा माणूस आहे. मी सरपंच असताना गावात लाईट आणली. मी चांगले काम केले म्हणून लोकांनी मला सभापती, आमदार, खासदार, मंत्री केले. पैसे आणणे माझे काम आहे, मी सासू आहे आणि अरविंद चव्हाण, अर्जुन खोतकर माझ्या सुना आहेत, असे सांगत त्यांनी एकच हश्या पिकवला. पुढच्या वेळेस मी आमदार होतो आणि अर्जुन राव यांना खासदार करतो. अर्जुन खोतकर माझी सून असले तरी जनता बाप आणि आजोबा आहे. मी केंद्रात बसलो याचे श्रेय जनतेला आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांची जंत्रीच वाचून दाखवली. त्यांनी विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला.