मोठी बातमी : रावसाहेब दानवे विधानसभा लढवणार?; म्हणाले, पराभूत झालो असलो तरी…
Raosaheb Danve on Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच घडामोडींना वेग आला आहे. रावसाहेब दानवे हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. दानवे काय म्हणाले? वाचा सविस्तर...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारूण पराभव झाला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. आता राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या विधानसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील लढतील, अशी चर्चा होत आहे. यावर आता स्वत: रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पराभूत झालो असलो तरी पक्षाने मला पद दिलं आहे. मी निवडणूक लढणार नाही, असं रावसाहेब दानवे म्हणालेत. महायुतीचा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर आम्ही एकत्र बसून चर्चा करू. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून निवडणुकीपूर्वी आम्ही कुणालाही प्रोजेक्ट करणार नाही, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीबाबत काय म्हणाले?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा केव्हा ही होऊ शकते. आता पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली म्हणजे केव्हा ही निवडणूक जाहीर होईल. राजकीय पक्षांनी मैदान साफ करण्यासाठी सुरुवात केली आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपावर दानवे काय म्हणाले?
महायुतीच्या जागावाटपावर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्या पुन्हा दिल्लीत बैठक आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल, यादी ठरवली जाईल. 40 दिवस आधी उमेदवार घोषित करत नाही. त्यांनी केले नाही आम्ही पण केले नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जेव्हा बैठक घेणार तेव्हा यादी जाहीर होणार आहे, असं दानवे म्हणाले आहेत.
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आणि त्याच्या जाहिरातीवरही दानवेंनी भाष्य केलंय. त्यांनी हरयाणात लाडकी बहिण योजना सुरू केली. निवडणूक झाल्यावर बंद करून टाकल्या. इतर ठिकाणच्या बंद केल्या. मात्र आपल्याकडे आमचं सरकार आहे. आम्ही ही योजना सुरूच ठेवणार आहोत. आम्ही पैसे वाढवले मात्र बंद नाही केले. आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली तर कोर्टात गेले. राहुल गांधी जेव्हा आमचं सरकार आल्यावर आठ हजार देऊ खटाखट देऊ असे म्हणाले होते. तर ते आता द्यायला सुरुवात करावी, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.