Santosh Deshmukh Case : सरकार आरोपींना सोडून देते की काय… मनोज जरांगेंच्या शंकेने राज्यात मोठे काहूर, आता केली ही मोठी मागणी
Manoj Jarange big Statement : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. पण तपासाचे चक्र आणि अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सुरुवातीला तपासाला वेग नव्हता. आरोपींना वाचवण्याचा खुलेआम प्रकार घडला. त्यानंतर जनरेटा वाढला. अनेक मोर्चे निघाले. त्यावेळी आरोपींच्या मर्जीतील पोलीस अधिकारी बदलले. तपासाला गती आली. पण आता हे पुन्हा हे प्रकरण रेंगाळल्यासारखे दिसत आहे. कृष्णा आंधळे हा फरार आहेत. तर आरोपींना खास ट्रीटमेंट मिळत असल्याचा सातत्याने आरोप करण्यात येत आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी तपास यंत्रणांचे वाभाडे काढले आहेत.
तपास यंत्रणेवर प्रश्नांची सरबत्ती
संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. फरार असताना हे आरोपी कोणाच्या घरी होते हे सगळं चार्जशीट मध्ये आलं पाहिजे.या मधील मुख्य नेता कोण,कोणाच्या घरी राहिले याची चौकशी झाली पाहिजे असे ते म्हणाले. ज्या ज्या पोलिसांनी यांना सहकार्य केलं त्यांना अजून बडतर्फ केलं नाही, हा मुद्दा त्यांनी उचलून धरला. तर उज्ज्वल निकम यांना अजून प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली नसल्याचे ते म्हणाले. आरोपींच्या संपत्तीची चौकशी का केली नाही, असा सवाल त्यांनी केला.




जरांगे पाटील यांची शंका काय?
त्यांनी वाल्मिक कराड याला देण्यात येत असलेल्या खास ट्रीटमेंटवर सुद्धा आक्षेप घेतला. वाल्मिक कराड याला काहीच झाले नाही तरी सुद्धा त्याला आयसीयूमध्ये का दाखल केलं असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी, आम्हाला अशी शंका येत आहे की सरकार आता हे आरोपी सोडून देत की काय, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.
या मधला बडा नेता कोण हे शोधा. दररोज काहीतरी पुरावे बाहेर येत आहे. बाकीचे सह आरोपी का नाही केले. चौकशी करता आणि सोडून देता. यांचे करोडो रुपयांचा घोटाळा निघाला, पळून जाताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये सापडले. तरीही कारवाई होत नाही. त्यामुळे आम्हाला संशय येऊ लागले आहे की पुरावे नष्ट करणार आहे, असे ते म्हणाले.
दररोज या संदर्भात अनेक पुरावे समोर येत आहे. खंडणी मागणारे हेच,खून करणारे हेच आहेत. जे आरोपी फरार होते,ते कुणाच्या तरी घरी होते. एकाने मोबाईल फेकून दिला. ज्या पोलिसांचा या प्रकरणाशी संबंध आहे त्या पोलिसांचे सीडीआर काढा. या मध्ये कोण बडा नेता आहे ते बाहेर काढा, अशी मागणी त्यांनी केली.