अहमदनगरः राज ठाकरेनी (Raj Thackrey) ज्या मशिदीवरील (mosque) भोंग्यावरुन राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापवले आहे. त्या वातावरणाला छेद देऊन शिर्डीमध्ये सामाजिक सौहार्द जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिर्डीमधील साईमंदिराची (Sai Mandir Shirdi) काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नका अशी भूमिका आता शिर्डीतील मुस्लिम समाजाने घेतली आहे. शिर्डीतील साईमंदिरावरही भोंगे लावले गेले आहेतच, त्यावरुन नेहमीच काकड आरती आणि शेजारती होते असते. राज ठाकरेंनी मशिद आणि हिंदू मंदिरावरील भोंगेही उतरवण्याची मागणी केली होती, मात्र याविरुद्धचं भूमिका शिर्डीमध्ये घेतली गेल्याने राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.
साईमंदिरावरील भोंगे उतरवू तर नकाच पण आमच्या मशिदीतील पहाटे 6 वाजण्याअगोदरची आजान लाऊड स्पीकरवर होणार नाही अशीही त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिर्डीत आजही ज्या साईबाबांच्या भक्तीसाठी हिंदू मुस्लिम समाजातील अनेक भक्त साईबाबांचे दर्शन घेतात, त्या साईबाबांची जी सर्वसमभावाचे प्रतीक जी जनमाणसात होती ती पुन्हा एकदा ठळक झाली आहे.
शिर्डीतील साईमंदिरावरील भोंगे उतरवू नका, अशी भूमिका घेत जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमुशुद्दीन इनामदार यांच्यासह मुस्लिम समुदायाचे प्रशासनाला निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.
भोंगे प्रकरणावरुन राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. आजच मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतना मुंबईत महिला पोलीस पडल्याने संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर विविध कलमे लावून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला गेला आहे.
मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटळा असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 2005 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही भाजपने मनसेसारख्या पक्षाला पुढे करुन हा विषय कारण नसताना चर्चेत आणला असून त्यामुळे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे असल्याची टीकाही सआज संजय राऊत यांनी केली.
यावेळी संजय राऊत यांनी सांगितले की, मी पाहतो आहे जो गुप्तचर खात्याचा किंवा इतर खात्याचा अहवाल आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रमुख श्रद्धास्थानं जी आहेत. त्यामध्ये प्रमुख शिर्डी, त्र्यंबकेश्वर अशा अनेक ठिकाणी सकाळच्या काकड आरत्या होत असतात. मंदिरात त्यावेळी खूप कमी लोकांना प्रवेश असतो मात्र, या काकड आरतीसाठी हजारो लोक वाट पाहत असतात. आज भोंग्यांच्या विषयामुळे या संपूर्ण देवस्थानावर लाऊडस्पीकर लागले नाहीत आणि लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाली आहे. त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करुन भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदुंचाही गळा घोटला हे स्पष्ट केले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.