जरांगे याचं उपोषण, शिंदे फडणवीस दिल्लीत, ‘त्या’ शपथेवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल, म्हणाले ‘टोप्या घालून…’
नेत्यांचा आम्ही सन्मान करतो. पण, तोंडापुरतं नाही बोलत. आम्ही सन्मान करतो ते चांगले आहेत. आता त्यांना कोण देऊ देईना हे आम्हाला आज दिवसभर शोधावं लागतंय का काय? कारण त्यांनी शब्द दिला की पाळत्यात ही त्यांची राज्यात ख्याती आहे असे जरांगे पाटील म्हणालेत.
मुंबई | 25 ऑक्टोंबर 2023 : कुणबी जातीचे दाखले मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदान येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण देणारच अशी जाहीर घोषणा केली. नव्हे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत आरक्षण देणारच असा शब्द दिला. छत्रपतींच्या समोर साक्षीने याठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार असे मुख्यमंत्री म्हणाले. तरीही जरांगे यांनी सरकारला अधिक वेळ देण्यास नकार दिला. तर, इकडे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तडकाफडकी दिल्लीत गेले. चाळीस दिवसांची मुदत संपल्यावरही सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही. त्यामुळं आमरण उपोषण सुरू करताना जरांगेंनी मराठ्यांना आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण रोखतंय? असा सवालही विचारला.
जरांगे पाटील आणखी एक वेगळी शंका उपस्थित केली आहे. मी काय त्यांचा नाही. पण तळमळ पाहता काही तरी आहे. काहीतरी आत शिजतंय. नसते तर त्यांनी छत्रपतीची शपथ वाहिली नसती. काही तरी आज शिजत आहे. शंभर टक्के. त्यांनी चाळीस दिवस घेतलेच नसते. म्हणजे कुणाचा तरी विरोध आहे. मी असले शब्द कधीच बोलत नाही. कोण आहे बघू. ते मी सांगणार आहे. आम्ही शोधलाय. जवळपास बघू थांबा थोडं, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा आदर केला. मात्र, उपोषण रोखण्यास नकार दिला.
मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यातून शिवरायांची शपथ घेतली आणि इकडे लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळं अचानक शिंदे फडणवीस दिल्लीला का आले? मराठा आरक्षणावर काही ठरणार आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय.
काहीतरी जादूची कांडी फिरणार
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून चोवीस तासात काहीतरी जादूची कांडी फिरणार असेल म्हणूनच शिंदेंनी छत्रपतींची शपथ घेतली असावी असं म्हटलंय. मला असं वाटतं की आपण त्यांना चोवीस तासाचा कालावधी देऊया. काल त्यांनी तो आशीर्वाद घेतलाय. काहीतरी सोल्यूशन असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपतींचा शपथ घेऊन एखादा शब्द देतात म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी मार्ग असणार ना? त्याच्याशिवाय असं कसं केलं असतं असे त्या म्हणाल्या आहेत.
डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे यांनी खोटी शपथ घेतली आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शिंदे शिवसेनेतच राहणार होते, राहिले का? भारतीय जनता पक्षाच्या सहवासात आल्यापासून खोट्या शपथा घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. शपथा कसल्या घेतल्या छत्रपती शिवरायांच्या? हे भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर सगळं चाललंय. त्यांना स्वतःचा आचार विचार, भूमिका काही नाही. जे BJP सांगेल तेच. काही दिवसांनी डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील अशी टीका राऊत यांनी केली.
काय चुकलं आमचं याचं उत्तर द्या
जरांगे पाटील याचं पहिलं आमरण उपोषण सतरा दिवस चाललं. आरक्षणाच्या मोबदल्यात चाळीस दिवसांची मुदत या अटीवर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. आता पुन्हा एकदा उपोषण सोडण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांना फोन केला. उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. तेव्हा पाटील म्हणाले, एक महिना पाहिजे आम्ही एक्केचाळीस दिवस दिले. आता प्रोब्लेम काय? चाळीस वर्षांपासून काम चालूच आहे ना? अभ्यास आणि ते समिती. मी आता बसलोय. तुमचा सन्मान ठेवला. काय चुकलं आमचं याचं उत्तर द्या. असे पाटील म्हणाले.
शिंदे, फडणवीस तिढा सोडवणार का
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं काय झालं? असा जाब पाटील यांनी महाजन यांचा विचारला. दोन दिवसात गुन्हे मागे घेतो म्हणाले. अंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेतले का? तुम्हाला ते बी होईना तर आरक्षण कशाचं देतात तुम्ही आम्हाला? अशा शब्दात पाटील यांनी मंत्री महाजन यांना खडसावले. कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारला आणखी वेळ हवा. मात्र 40 दिवस काय केलं ? असं जरांगे पाटील याचं म्हणणे आहे. त्यामुळे आता दिल्लीला जाऊन शिंदे, फडणवीस हा तिढा सोडवणार का ते पहायला हवं.