राम शिंदे निवडूनच येणार नाही, तर त्यांना मंत्री कसं करणार? : जयंत पाटील
भाजपचे नेते आणि जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे त्यांना मंत्री कसं करणार, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विचारला आहे. ते राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत जामखेड येथे बोलत होते.
अहमदनगर : भाजपचे नेते आणि जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे त्यांना मंत्री कसं करणार, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विचारला आहे. ते राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत जामखेड येथे बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) यांनी अहमदनगरमध्ये महा जनादेश यात्रेत बोलताना राम शिंदे यांना पुन्हा मंत्री करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राम शिंदे यांना जेवढे जास्त मते मिळतील तेवढे मोठे मंत्रीपद देऊ, असंही म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना जयंत पाटील यांनी राम शिंदे निवडूनच येणार नाही, तर त्यांना मंत्री कसं करणार? असा प्रश्न करत आव्हान दिलं.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत खासदार अमोल कोल्हे यांचं रथातून आगमन झालं. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अंकुश काकडे आणि रुपाली चाकणकर हेही उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, “एकीकडे माझ्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतो आहे, पूर आला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना यांच काहीही देणंघेणं नाही. ते केवळ यात्रा काढत आहेत. विरोधकांना ईडीची भीती दाखवत आहेत.”
भाजपच्या कार्यकर्त्यांवर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांची भाषणं ऐकण्याची वेळ आल्याचाही टोला जयंत पाटील यांनी लगावला. आमच्याकडे शरद पवार नावाचं विद्यापीठ आहे. पक्षात आता नवीन लोकांना संधी मिळत आहे, असंही त्यांनी नमूद केलं. रोहित पवारांचा आजच विजय झाल्याचाही दावा जयंत पाटलांनी केला.
‘जामखेडमधील मंत्री बॅनर मंत्री’
शिवस्वराज्य यात्रेत बोलताना रोहित पवार यांनी देखील राम शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. जामखेडमध्ये अनोखा प्रयोग केला जात आहे. येथील मंत्री बॅनर मंत्री झाले आहेत. ते फक्त गावागावात विकासकामांचे बोर्ड लावत आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडलं.
मुख्यमंत्र्यांच्या यात्रेवर टीका करताना रोहित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या यात्रेतील रथासाठी रस्त्यावरची झाडं तोडण्यात आली. गरीबाच्या टपऱ्या तोडण्यात आल्या. कर्जत-जामखेड मतदारसंघात फिरताना या सर्व अडचणी समजून घेतल्या आहेत. येणाऱ्या काळात येथे विकास करायचा आहे. येथे इतका विकास करू, की 288 मतदारसंघात कर्जत-जामखेडचा आघाडीवर असेल.” इतक्या मोठ्या संख्येने जमून येथील सर्वांनी मला भावनिक केल्याचंही ते म्हणाले.