‘गद्दार या शब्दाला महाराष्ट्राने कधी माफ केलं नाही अन् म्हणून…’, जयंत पाटलांचा पुन्हा अजितदादांवर हल्लाबोल
जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते इंदापूरमध्ये बोलत होते. हर्षवर्धन पाटील निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सीट निवडून आल्यात जमा आहे. आमच्याकडे तपशील आहे. आता प्रश्न एवढाच आहे, भरणे मामाला किती हजार मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा असा खोचक टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
गद्दार या शब्दाला महाराष्ट्राने कधी माफ केलं नाही. मराठी माणसाला फसवलेलं, गद्दारी केलेली आवडत नाही, पवार साहेबांना फसवण्याचं गद्दारी करण्याच काम त्यांनी केलं, त्यांना महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात शिक्षा होणार आहे. हे आजचं वातावरण आहे. पवार साहेबांनी तुम्हाला काय नाही दिलं ? आमदारकी मिळाली, मंत्रिपद मिळालं, प्राधान्य तुम्हाला सतत दिलं. पवार साहेबांनी यांना सतत मंत्रिपद दिलं. आज त्याच पवार साहेबांना सोडून लोक गेले, त्यांना इंदापूरची जनता माफ करणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, पृथ्वीवर असा एकही पक्ष नाही त्यांना चिन्ह तर मिळालयं, पण त्याखाली लिहावं लागतय न्याप्रविष्ठ आहे म्हणून,आता निवडणूक आयोगाकडे तक्रार जाईल, कोर्टाचा अवमान केला आहे म्हणून. पाच टीएमसी पाण्याचा सर्व्हे करायची ऑर्डर मीच दिली होती. केवळ सर्व्हेला मंजुरी दिली होती, पाणी मंजूर केले नाही.सर्वे मी करायची आँर्डर दिली होती, श्रेय घेण्याच कारण नाही कारण त्याचं श्रेय शरद पवारांना पर्यायानं हर्षवर्धन पाटलांना जातं. पुढे या पाण्याची योजना होईल त्याचं उद्घाटन आमदार म्हणून हर्षवर्धन पाटीलच करतील असा मी शब्द देतो. उद्या महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे, याची मी खात्री देतो.
महाराष्ट्र महागाईने होरपळत आहे. उद्योग बाहेर जात होते तेव्हा त्रिकुटांनी तोंडातून ब्र शब्द काढला नाही, अमित शहांना प्रचंड घाबरतात हे. आज महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात दुसऱ्या-तिसऱ्या स्थानी होता, आज आपला अकरावा नंबर आहे. आज गुजरात आपल्यापुढे गेला आहे. याला दिल्लीत मोदींची आणि राज्यात फडणवीसांची सत्ता कारणीभूत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.