नाशिक : शिंदे सरकार (Eknath Shinde) मधील काही आमदार हे खाजगीत भेटल्यावर सांगतात…कुठून अवदसा आठवली आणि नादाला लागलो…अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. जयंत पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी हे म्हंटलं आहे. पाटील यांच्या या प्रतिक्रियेने मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला निमित्त मिळाले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हे शिंदे यांच्यासह भाजपवर टीका करण्याची एकही संधि सोडत नाहीये. त्यामुळे नाशिक दौऱ्यावर आलेल्या जयंत पाटलांनी शिंदे यांच्यासह भाजपवर सडकून टीका करत राजकीय टोलेबाजी देखील केली आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतांना पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले आहे.
याशिवाय अनेक आमदार खाजगीत भेटतात तेव्हा सांगतात, कुठून अवदसा आठवली आणि गेलो असे म्हणत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
याशिवाय केंद्रीय भाजपच्या नेत्या बारामती दौऱ्यावर आलेल्या असतांना जीएसटीबद्दल त्यांना प्रश्न विचारायची संधि दिली आहे त्यांना जनता विचारेल आता असे म्हणत निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली आहे.
इतकंच नव्हे, बारामती मध्ये येऊन त्यांना छुप्या पद्धतीने विकास बघायचा आहे, याशिवाय भाजपला देखील माहिती आहे की बारामतीत भाजप जिंकू शकत नाही असे म्हणत पाटील यांनी टीका केली आहे.
याशिवाय पाटील यांनी येत्या काळातील निवडणुकीबाबत एकत्रित निवडणूका लढवायच्या का ? याबाबत स्थानिक पातळीवर अधिकार दिले असून समन्वय साधावा अशा सूचना दिल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे.