Jitendra Awhad: पण उघड पणाने सांगतो, आपण बैल खायचो, जितेंद्र आव्हाडांनी ‘उजव्यांना’ पुन्हा डिवचलं
मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हजारो वर्षांपासून जे काम आम्ही करत आलो, ते अंग मेहनतीचे आहे. जोपर्यंत अंगात शक्ती नाही, तोपर्यंत अंग मेहनत करता येत नाही. डाळ खाऊन कोणी अंग मेहनत केल्याचे जगात कोणाला माहिती नाही.
जळगावः आपण उघड पणाने सांगतो, बैल खायचो, असे म्हणत मंत्री जितेद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा उजव्यांना डिवचले आहे. ते जळगावमध्ये आले असता बोलत होते. आव्हाड म्हणाले की, जोपर्यंत राम (Ram) गांधींचा होता, तोपर्यंत राम तत्त्वज्ञानी होता. आज राम भलत्यांच्याच हातात गेलाय. तो सत्तेचा व सत्ता मिळवण्याचे साधन झालाय. रामाचे तत्वज्ञान संपले आहे. दिल्लीतल्या जेएनयूमध्ये (JNU) झालेला हल्ला हा मांसाहार खाण्यावरून झाला. मात्र, आम्ही आम्ही शाकाहारी नाहीच. आमच्या रक्तात शाकाहार नाही. मटण, बोकड खाल्ल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खा, आम्हाला जे खायचं ते आम्हाला खाऊ द्या, असे आवाहनही आव्हाड यांनी केले. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतल्या जेएयू विद्यापीठातील वसतिगृहात मांसाहार जेवणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांत वादंग निर्माण झाले होते. हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. यावरून आव्हाडांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
गायीचे मांस खात नाही…
मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हजारो वर्षांपासून जे काम आम्ही करत आलो, ते अंग मेहनतीचे आहे. जोपर्यंत अंगात शक्ती नाही, तोपर्यंत अंग मेहनत करता येत नाही. डाळ खाऊन कोणी अंग मेहनत केल्याचे जगात कोणाला माहिती नाही. गोवंश हत्या बंदी आणली गेली. मात्र, गायीचे मांस मुस्लिम, ख्रिश्चन व आम्ही कोणी खात नाही. म्हशीचे मांस मुस्लिम, ख्रिश्चन व कुणीच खात नाही, पण उघड पणाने सांगतो आपण बैल खायचो.
तुमच्या बापाचा भारत आहे का?
मंत्री आव्हाड पुढे म्हणाले की, आपण बैल खायचो, कारण मटण परवडत नव्हते. तसेच एका वेळेस आणलेले बैलाचे मटण हे गरिबाच्या घरात चार – चार दिवस शिजवले जायचे. आज मटण सातशे रुपये किलोवर गेले आहे. जे आमचे आहे ते आमच्यापासून हिरावून घेतले आहे. का आम्हाला उपाशी मारताय, आम्हाला जे खायला येते ते खाऊ. तुम्ही कोण आम्हाला सांगणारे, हे खाऊ नका ते खाऊ नका असे वागू नका, तुमच्या बापाचा भारत आहे का, असा सवाल त्यांनी केला.