लाडकी बहीण ते बाबा सिद्दिकी व्हाया गुजरात, आव्हाडांचा नाशिकमध्ये सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला देखील चांगलाच वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकमध्ये आले असताना बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी लाडक्या बहीण योजनेवरून जोरदार निशाणा साधला. सगळी तिजोरी राज्याची खाली झाली आहे, सगळ्या योजना या एका योजनेमुळे बंद पडल्या आहेत. लोकसभा निवडणूक हरले म्हणून ही योजना आणली, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
सगळी तिजोरी राज्याची खाली झाली आहे, सगळ्या योजना या एका योजनेमुळे बंद पडल्या आहेत. लोकसभा निवडणूक हरले म्हणून ही योजना आणली, निवडणुकीच्या अगोदर हे आणणे म्हणजे समोर पराभव दिसलेला आहे. महिलांना एक प्रकारे लाच देऊन ही योजना सुरू केली. महागाई वाढली आहे. महिलांचे सक्षमीकरण केलं पाहिजे पण त्यांच्यावर बलात्कार होतोय, त्याचे काय करायचे महिला सुरक्षित राहिल्या आहेत का? असा सवाल यावेली जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, बाबा सिद्दिकी सारख्या माणसाला मारण्यात आले, मुंबई पोलिसांना हे देखील कळले नाही की राज्यात कोण आले. सरकारी यंत्रणा दबावाखाली काम करत आहे. तुमच्या गंगाजळीत पैसे उरले नाही तर वेतन कुठून येणार? महाराष्ट्र विका पण आम्हाला सत्तेवर बसवा. आज आपल्या पोरांना नोकरीसाठी गुजरातला जावे लागत आहे. आमची जबाबदारी आहे निवडणूक लढविण्याची. माझी विचारधारा शिव, फुले, आंबेडकरांची आहे. ती वाचविण्यासाठी मी फिरेल असं आव्हाडांनी यावेळी म्हटलं आहे. –