‘मनोज जरांगे मौलाना मोमीन यांच्यासोबत…’, कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून चांगलाच वाद झाला होता. ‘मनोज जरांगे पाटील हे हिंदू धर्मामध्ये फूट पाडणारे राक्षस आहेत’ असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान कालीचरण महाराज यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे, हा वाद अजूनही शांत झाला नाही, तोच पुन्हा एकदा कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘द्वेष मला हिंदू धर्मद्रोह्यांचा आहे, ज्यांच्यामुळे हिंदू धर्मामध्ये फूट पडत आहे, त्यांचा मला द्वेष आहे. जरांगे यांच्यामुळे हिंदू धर्मात फूट पडत आहे,’ असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज?
‘द्वेष मला हिंदू धर्मद्रोह्यांचा आहे. ज्यांच्यामुळे हिंदू धर्मात फूट पडत आहे, त्यांचा मला द्वेष आहे. जरांगे यांच्यामुळे हिंदू धर्मामध्ये फूट पडत आहे. मौलाना मोमीन यांच्यासोबत बसणे, चादर चढवायला जाणे, मौलाना असेल इम्तियाज जलील असतील, मुसलमानाच्या मांडीला मांडी लावून बसले, त्यांनी मराठा समाजाला कुठलं आरक्षण मिळवून दिलं?’ असा सवाल कालीचरण महाराज यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हे चादर चढवतात, माथा टेकवतात. यांचे मनसुबे नक्की काय आहेत? हिंदूंना फोडणे, हिंदूत्वादी सरकार पाडणे, मुसलमान धार्जिण सरकार सत्तेत बसवणे जे गोमांस खाणाऱ्या सोबत राहातात, हिंदूंना फोडत आहेत ते राक्षस आहेत म्हणून मी असं बोललो. जरांगे पाटलांना मी आधी खूप तपस्वी समजत होतो, मात्र याच्या पाठीमागे कोणाचातरी हात आहे,’ असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ‘हिंदुराष्ट्र स्थापित व्हाव, लव्ह जिहाद नष्ट व्हावा त्यासाठी हिंदुत्ववादी लोकांना सत्तेत पाठवण्याचा आमचा निरंतर प्रयत्न आहे. कट्टर हिंदुत्ववाद्यांना सत्तेत बसवा. जे लोक आता जरांगे पाटलांना सपोर्ट करत आहेत, त्यांनी अण्णासाहेब पाटलांना सपोर्ट केला का? मला कुठल्याही जातीचा द्वेष नाही पण जे हिंदू द्वेष्टे आहेत त्यांचा मी कठोर द्वेष करतो. तुम्ही मला काहीही म्हणा. जरांगे पाटलांनी हिंदुत्वाचं काम जर केलं असतं तर मी अधिक प्रभावीत झालो असतो पण ते मौलाना सोबत जाऊन बसले, असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.