कल्याण : पानशॉपवाल्यांना सिगारेटची पाकिट पुरविणा-या सप्लायरची (Cigarette Supplier) सिगरेटने भरलेले बॅग लंपास करणाऱ्या दोघांना कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत . या दोघांनी चोरलेला माल खरेदी करणा-या एका पानटपरीवाल्याला देखील पकडण्यात आले आहे. गणेश जळगावकर , प्रसाद राजगुरू पानटपरीचालक अच्छेलाल साकेत असे या तिघांची नावे आहेत . कल्याण पुर्वेतील (Kalyan) मनीषा नगर कॉलनीत सिगारेटची पाकिट पानशॉपवाल्यांना पुरविणा-या विवेककुमार सिंघ नावाच्या व्यक्तीची नजर चूकवून भर रस्त्यातून त्याच्या गाडीवरील सिगारेटची पाकिट असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली होती. सुमारे 80 हजारांचा मुद्देमाल चोरीप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . याचा समांतर तपास कल्याण क्राईम ब्रांच करीत होती.
या गुन्हयातील आरोपींबाबत गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार विनोद सोनवणे यांना खब-यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक आनंद रावराणे यांच्यासह त्यांच्या पथकाने डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा पेट्रोल पंप लगत असलेल्या किराणा स्टोअर्स परिसरातून गणेश जळगावकर आणि प्रसाद राजगुरू या दोघांना सापळा लावून अटक केली. त्यांच्याकडे चौकशी करता कल्याण पूर्वेत सिगारेटची पाकिट असलेली बॅग चोरून नेल्याची कबुली त्यांनी दिली.
चोरलेली सिगारेटची पाकिटे त्यांनी ओळखीचा पानटपरीवाला अच्छेलाल साकेत याला कमी किमतीत विकली होती हे देखील तपासात उघड झाल्याने .कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकत कोळसेवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले . सध्या कोळसेवाडी पोलीस या आरोपीला ताब्यात घेत अजून किती ठिकाणी चोरी केली आहे याचा तपास करत आहे, अशी माहिती एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली आहे.