Kalyan : तुमची होते मजा पण आम्हाला सजा ! गावातील झुंजीत दोन बैल गंभीर जखमी, बैल मालकांवर गुन्हा दाखल
प्राण्यांची झुंज लावणं हे क्रूर आहे. पण तरीही काही लोकं स्वत:च्या आनंदासाठी मुक्या प्राण्यांची झुंज लावतात. मात्र त्यामुळे त्या मुक्या जीवांना त्रास होतो. असाच एक प्रकार कल्याण जवळच्या गावात घडला आहे. जेथे झुंज लावल्यामुळे दोन बैल गंभीर जखमी झाले.
कल्याण | 17 जानेवारी 2024 : प्राण्यांची झुंज लावणं हे क्रूर आहे. पण तरीही काही लोकं स्वत:च्या आनंदासाठी मुक्या प्राण्यांची झुंज लावतात. मात्र त्यामुळे त्या मुक्या जीवांना त्रास होतो. असाच एक प्रकार कल्याण जवळच्या गावात घडला आहे. जेथे झुंज लावल्यामुळे दोन बैल गंभीर जखमी झाले. आपल्या बैलाला जिंकून आणण्यासाठी दोन्ही मालकांनी हरतऱ्हेची मेहनत घेतली. तथापि जिंकण्याच्या चढाओढीत दोन्ही बैलांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. हौस आणि निष्काळजीपणातून हा प्रकार घडल्याने खडकपाडा पोलिसांनी दोन्ही बैल मालकांविरोधात प्राण्यांना निर्दयीपणे वागविणे प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल
रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या जवळील अटाळी गावात गुरचरणीच्या मोकळ्या जागेत किंग आणि भावड्या या दोन बैलांच्या झुंजी लावल्या होत्या. त्यांच्या मालकांनी आपल्या बैलास प्रतिस्पर्धी भावड्या बैलाबरोबर झुंजवले. आपल्या बैलाला जिंकून आणण्यासाठी दोन्ही मालकांनी हरतऱ्हेची मेहनत घेतली. तथापि जिंकण्याच्या चढाओढीत दोन्ही बैलांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. या झुंजीची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांच्या पथकाने अटाळी गावात जाऊन गावात बैलांच्या झुंजी कोणी आयोजित केल्या होत्या याची माहिती काढली.
नरेंद्र नामदेव पाटील , हेमंत राम पाटील या दोघांनी आपल्या बैलांना झुंजवल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी नरेंद्र, हेमंत यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी दोघांनी बैलांच्या झुंजी लावल्याची कबुली दिली. तेव्हा पोलिसांनी किंग आणि भावड्या बैलाची पाहणी केली. त्यावेळी एक बैलाच्या कपाळाला तर एकाच्या मानेवर धारदार शिंगे लागल्याचे आणि ते जखमी झाल्याचे पोलिसांना दिसले. या दोन्ही बैल मालकांनी प्राण्यांना निर्दयीपणे वागवून त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला म्हणून खडकपाडा पोलीस ठाण्यात नरेंद्र नामदेव पाटील , हेमंत राम पाटील या दोन बैल मालकांविरूध्द प्राण्यांना निर्दयीपणे वागविणे प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बैलांवर घरगुती पध्दतीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत, असे बैल मालकांनी सांगितले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यापासून पुन्हा बैलांच्या शर्यती, बैलांच्या झुंजी हे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. यामध्ये बैलांना खूप अमानुषपणे मारले जाते, असे प्राणीमित्रांनी सांगितले.