Kalyan News : ही कसली स्मार्ट सिटी? हलगर्जीपणामुळे कल्याणमध्ये गटारात पडला वृद्ध
कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये ठेकेदारांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. गटारांवर झाकण नसल्याने एका वृद्ध नागरिकाचा गटारात पडून दुखापत झाली. नागरिकांच्या सुरक्षेचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची उदासीनता यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. घटनेनंतर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही, ज्यामुळे ठेकेदार आणि प्रशासनावर कारवाईची मागणी होत आहे.

स्मार्ट सिटी म्हणून कल्याणचा बऱ्याच दिवसांपासून बोलबाला होत आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकासकामे सुरू आहेत. मात्र त्याच कामांमध्ये ठेकेदारांकडून गंभीर हलगर्जीपणा केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील गटारांवर झाकण नसल्याने एका पादचारी त्यात पडला आणि दुखापत झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये अतिशय नाराजीचं वातावरण आहे.
नेमकं काय घडलं ?
कल्याण न्यायालय आणि तहसीलदार कार्यालयाबाहेरच्या मुख्य रस्त्यालगत खोदलेल्या गटारींवर झाकण बसवण्यात आलेले नाही. ठेकेदारांनी नियमांकडे दुर्लक्ष करत झाकणाऐवजी फक्त लाकडी फळी ठेवली आहे. काल या फळीवरून जात असताना एक वयोवृद्ध नागरिक तोल जाऊन थेट गटारात पडले. आजूबाजूच्या परिसरातील पोलीस आणि नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि त्या वृद्धाला गटारातून बाहेर काढलं. मात्र या हलगर्जी कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
“ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडली आहे. नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही.”स्मार्ट सिटीच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे असा आरोप शहरातील नागरिकांकडून केला जात आहे. असे प्रकार घडू नयेत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अशी घटना घडूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. नागरिकांनी ठेकेदार आणि प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.